Holi Trade In India : रंगांची उधळण करणाऱ्या होळीचा सण संपूर्ण देशभर साजरा केला गेला. या आधी होळीमध्ये चीनच्या रंगांचा आणि साहित्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जायचा. पण हे चित्र यंदा बदलल्याचं दिसलंय. CAT या व्यापारी संघटनेच्या सर्वेक्षणानुसार, होळीच्या निमित्ताने यंदा 50 हजार कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. एकट्या दिल्लीत ही उलाढाल पाच हजार कोटींहून अधिक झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या होळीत 50 टक्क्यांहून अधिक उलाढाल झाल्याचं आकडेवारी सांगतेय. 


चीनला 10 हजार कोटींचा धक्का


केंद्र सरकारच्या व्होकल फॉर लोकल मोहिमेमुळे देशात बनवलेल्या उत्पादनांना लोकांची पहिली पसंती मिळाल्याचं आकडेवारीवरून समोर आलंय. पूर्वी भारतीय व्यापारी चीनकडून स्वस्त मालाची मागणी करत असत. पण 2020 मध्ये गलवान व्हॅलीमध्ये झालेल्या संघर्षानंतर भारतातील ग्राहक आणि व्यापाऱ्यांनी चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्यास सुरुवात केली आहे. अशा स्थितीत यंदाही होळीच्या दिवशीही बाजारपेठेतून चिनी वस्तू गायब झाल्याचं दिसलंय. देशातील स्थानिक व्यापाऱ्यांनी देशात बनवलेले रंग, गुलाल, पिचकारी यांची विक्री झाली. 


या आधीच्या आकडेवारीची तुलना करता चीनमधून आयात केलेल्या साहित्याची संख्या नगण्य असल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळे चीनला याचा जवळपास 10 हजार कोटींचं नुकसान झालं आहे. 


भारतीय साहित्यांना मोठी मागणी


यावेळी केवळ भारतात बनवलेले हर्बल रंग आणि गुलाल, पिचकारी, फुगे, चंदन, पूजा साहित्य, कपड्यांसह इतर वस्तूंची मोठ्या प्रमाणात विक्री झाली. याशिवाय मिठाई, सुका मेवा, भेटवस्तू, फुले व फळे, कपडे, फर्निशिंग फॅब्रिक, किराणा, एफएमसीजी उत्पादने, ग्राहकोपयोगी वस्तू यासह इतर उत्पादनांना जोरदार मागणी होती.


दरवर्षीप्रमाणे यंदाही दिल्लीसह देशभरात मोठ्या प्रमाणावर होळी साजरी करण्यात आली. बँक्वेट हॉल, फार्म हाऊस, हॉटेल, रेस्टॉरंट आणि सार्वजनिक उद्यानांमध्ये या कार्यक्रमांमध्ये लोकांनी उत्साहाने सहभाग घेतला. एकट्या दिल्लीत लहान-मोठे असे तीन हजाराहून अधिक होळीचे कार्यक्रम साजरे करण्यात आले. त्याचा हॉटेल उद्योग तसेच इव्हेंट इंडस्ट्री, केटरिंग आणि संगीताशी संबंधित व्यावसायिकांना फायदा झाला.


ऑनलाईन कंपन्यांचा विक्रीचा विक्रम


झोमॅटोच्या ब्लिंकिट, झेप्टो आणि स्विगी इंस्टामार्ट सारख्या क्विक-कॉमर्स प्लॅटफॉर्मने होळीच्या दरम्यान विक्रीचे नवीन विक्रम प्रस्थापित केले. होळीवर लोक ज्या वस्तूंची ऑर्डर देत होते त्यात गुलाल, पिचकारी, मिठाई तसेच फुलांचा समावेश होता. यासोबतच लोकांनी ऑनलाइन माध्यमातून खोबरेल तेल आणि पांढऱ्या टी-शर्टचीही मोठ्या प्रमाणात खरेदी केली. 


स्विगी इंस्टामार्टला एकाच दिवसात 7 लाखांहून अधिक ऑर्डर्स मिळाल्या, हा आतापर्यंतचा सर्वात मोठा विक्रम आहे. तर झेप्टोने 6 लाखांहून अधिक ऑर्डर मिळवण्याचा विक्रम केला आहे. त्याचप्रमाणे ब्लिंकिटलाही एका दिवसात सुमारे 6 लाख ऑर्डर्स मिळाल्या.


 






ही बातमी वाचा: