नवी दिल्ली: HCL या टेक्नॉलॉजी कंपनीचे कर्मचारी आता मालामाल होणार आहेत. कंपनीच्या कर्मचाऱ्यांना या महिन्यात आता 700 कोटी रुपयांचा विशेष बोनस देणार असल्याचं कंपनीच्या वतीनं जाहीर करण्यात आलं आहे. 2020 सालामध्ये HCL कंपनीला जवळपास 72,800 कोटी रुपयांचा महसूल मिळाला असल्याने कंपनीच्या वतीनं ही घोषणा करण्यात आली आहे.


कंपनीच्या वतीनं एक निवेदन जाहीर करण्यात आलंय. त्यामध्ये म्हटलं आहे की, कंपनीच्या वतीने कर्मचाऱ्यांसाठी 700 कोटी रुपयांच्या विशेष बोनसची घोषणा करण्यात येत आहे. 2020 साली कंपनीला 10 अरब डॉलरचा महसूल मिळाल्याने हा निर्णय घेण्यात येत आहे. कंपनीच्या या उल्लेखनीय कामगिरीचे स्मरण ठेवण्यासाठी आणि सर्व कर्मचाऱ्यांचे आभार मानण्यासाठी हा विशेष बोनस देण्यात येत आहे.


माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचा ट्विटरला झटका, स्वदेशी मायक्रो ब्लॉगिंग साईट Koo वर अकाऊंट ओपन


कंपनीने जाहीर केलेल्या या बोनसचा लाभ एक वर्ष किंवा त्या पेक्षा जास्त काम केलेल्या कर्मचाऱ्यांनाच मिळणार असल्याचं कंपनीच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलंय. हा बोनस कर्मचाऱ्यांच्या दहा दिवसाच्या पगाराइतका असेल हेही सांगण्यात आल आहे.


HCL टेक्नॉलॉजी कंपनीने मुख्य मानव संसाधन अधिकारी अप्पाराव व्हीवी यांनी सांगितलं की कोरोना काळात जगभरात मंदी असताना HCL टेक्नॉलॉजी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी शानदार कामगिरी करत कंपनीच्या विकासात महत्वाची भूमिका बजावली आहे. HCL टेक्नॉलॉजी कंपनीचे जगभरात 1,59,000 पेक्षा जास्त कर्मचारी आहेत. आता विशेष बोनसचा लाभ या कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.


HCL टेक्नॉलॉजीने जाहीर केलेल्या या बोनसमुळे कंपनीच्या कर्मचाऱ्यांमध्ये आनंद व्यक्त करण्यात येतोय. कंपनीचे कर्मचारी हेच कंपनीसाठी महत्वाची संपत्ती असल्याचे HCL टेक्नॉलॉजीने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याचं सांगण्यात येतंय.


WhatsApp च्या विवादास्पद पॉलिसीचा फायदा Telegram ला, बनलं सर्वाधिक डाऊनलोड झालेलं नॉन गेमिंग अॅप