GST Collection July 2022: जुलै महिन्यातील जीएसटी करात (July GST Collection ) वाढ झाली आहे. मागील महिन्यात एकूण जीएसटी करसंकलन 1.49 लाख कोटींहून अधिक झाले आहे. आतापर्यंतचे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक करसंकलन आहे. जून महिन्यात 1 लाख 44 हजार 616 कोटींचा जीएसटी कर जमा झाला होता. मागील सलग चार महिन्यांपासून करसंकलन 1.40  लाख कोटीहून अधिक आहे. महाराष्ट्रातून सर्वाधिक करसंकलन करण्यात आले. 


मागील वर्षातील जुलै 2021 च्या तुलनेत जुलै 2022 मध्ये जीएसटी कर संकलनात 28 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मागील वर्षी जुलै 2021 मध्ये एक लाख 16 हजार 393 कोटींचा जीएसटी जमा करण्यात आला. 


अर्थ मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, जुलै 20200 च्या  1,48,995 कोटी रुपयांच्या जीएसटी कर संकलनात सीजीएसटी 25 हजार 751 कोटी रुपये, एसजीएसटी 32 हजार 807 कोटी रुपये आणि आयजीएसटी 79,618 कोटी इतकी रक्कम जमा झाली. यामध्ये 41 हजार 420 कोटी रुपये हे वस्तूंच्या आयातीमधून वसूल करण्यात आले आहे. तर, उपकराच्या (सेस) माध्यमातून 10 हजार 920 कोटी रुपये केंद्र सरकारच्या तिजोरीत जमा झाले आहेत.  एक जुलै 2017 मध्ये जीएसटी लागू करण्यात आल्यानंतरची ही दुसऱ्या क्रमांकाचे करसंकलन आहे. मागील काही महिन्यांपासून जीएसटी करसंकलनात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. जीएसटी कररचनेत 18 जुलैपासून बदल करण्यात आले होते. या निर्णयावर विरोधकांनी टीका केली होती. 


 







महाराष्ट्राकडून जीएसटीत सर्वाधिक वाटा नोंदवण्यात आला आहे. महाराष्ट्रातून जुलै महिन्यात सर्वाधिक 22 हजार 129 कोटींचा जीएसटी जमा करण्यात आला. मागील वर्षीच्या तुलनेत 17 टक्क्यांची वाढ दिसून आली आहे. महाराष्ट्रानंतर कर्नाटकाचा मोठा वाटा राहिला. कर्नाटक राज्यातून जुलै 2022 मध्ये 9795 कोटींचा जीएसटी वसूल करण्यात आला. गुजरातमधून 9183 कोटींचा जीएसटी जमा झाला. तर, तामिळनाडूमधून 8449 कोटींचा जीएसटी वसूल झाला.