GST Meeting:  जीएसटी परिषदेच्या (GST Council Meeting) आज झालेल्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. ऑनलाईन गेमिंग (Online Gaming), हॉर्स रेसिंग (Horse Racing) आणि कॅसिनोवर (Casinos) 28 टक्के जीएसटी लागू होणार आहे. जीएसटी कौन्सिलच्या 50 व्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. जीएसटी कायद्यात सुधारणा केल्यानंतर हे नवीन कर लागू होणार आहेत. 


जीएसटी कौन्सिलने सिनेमाच्या तिकिटांसह पॉपकॉर्न आणि कोल्ड्रिंक्ससारख्या खाद्यपदार्थांवर जीएसटीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आता या सर्व गोष्टी कॉम्पोझिट सप्लाय म्हणून गणल्या जाणार आहेत. त्यामुळे सिनेमाच्या तिकीटाप्रमाणेच कर आकारला जाणार आहे. याचाच अर्थ सिनेमागृहातील रेस्टॉरंटमधील खाण्यापिण्यावर आता 5 टक्के जीएसटी भरावा लागणार आहे. यापूर्वी 18 टक्के जीएसटी लागू होता. जीएसटी कौन्सिलने अपीलीय न्यायाधिकरणाच्या स्थापनेलाही मान्यता दिली आहे.


जीएसटी कौन्सिलच्या बैठकीबाबत माहिती देताना अर्थमंत्री निर्मला सीतारमन (Nirmala Sitharaman) यांनी सांगितले की, चार वस्तूंचे जीएसटी दर कमी करण्यात आले आहेत. फिश पेस्टवरील जीएसटी 18 टक्क्यांवरून 5 टक्के करण्यात आला आहे. जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत कर्करोगावरील (Cancer Medicine) औषधांच्या आयातीवरील जीएसटी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासोबतच विशेष औषधांसाठी औषध आणि अन्नावरील IGST ही रद्द करण्यात आला आहे. जीएसटी कौन्सिलच्या (GST Council) या निर्णयामुळे कॅन्सरवरील औषध Dintuvximab ची आयात स्वस्त होणार आहे. 






इमिटेशन, जरी धाग्यावरील जीएसटी 12 टक्क्यांवरुन पाच टक्के करण्यात आला आहे. ऑटो क्षेत्राबाबतही एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे.  सेडान कारवर 22 टक्के सेस लावला जाणार नाही. जीएसटी नोंदणी करू इच्छिणाऱ्या व्यक्तीच्या खाजगी बँक खात्याचा तपशील आता अनिवार्य असणार आहे. वाहनांच्या नोंदणीवर लावण्यात येणाऱ्या जीएसटीचा हिस्सा आता राज्यांनादेखील देण्यात येणार आहे.  मेघालयाचे मुख्यमंत्री कॉनराड संगमा यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिगटाने अहवाल सादर केला होता. त्यानुसार, ऑनलाईन गेमिंगवर 28 टक्के जीएसटी लागू करण्यात आला आहे.