Monsoon Effect on Inflation : यंदाचा मान्सून (Monsoon) लांबल्याने याचा परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होताना दिसत आहे. जूनच्या दुसऱ्या आठवड्यात देशात मान्सून दाखल झाला, खरा पण त्यानंतर मात्र तो दडी मारून बसला. शुक्रवारपासून देशात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. पण पाऊस लांबल्याने याचा परिणाम अन्नधान्यांच्या किमतीवर झाला आहे. मान्सून लांबल्याने महागाईमध्ये वाढ झाल्याचं दिसून येत आहे. दरम्यान, सरकारने याबाबत पाऊल उचलण्यास सुरुवात केली असून अन्नधान्याच्या किमती आटोक्यात आणण्यासाठी सरकारने प्रयत्न सुरु केले आहेत.


खाद्यपदार्थांच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता


एल निनोमुळे मान्सूनवर परिणाम झाला आहे. त्यामुळे पाऊस लांबला खाद्यपदार्थांच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याचा सर्वाधिक फटका FMCG (Fast-moving Consumer Goods) क्षेत्रावर बसू शकतो, असे मानले जात आहे. दरम्यान, सरकारने खाद्यपदार्थांच्या पुरवठ्याबाबत आवश्यक उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. देशाच्या अनेक भागांत मान्सूनला उशीराने सक्रिय झाल्याने सरकारकडून पाऊल उचलली जात आहेत. खाद्यपदार्थांच्या पुरवठ्याबाबत बैठकांच्या फेऱ्या सुरू झाल्या आहेत. पेरणीपासून उत्पादनाच्या अंदाजापर्यंत माहिती गोळा केला जात आहे.


सणासुदीचा हंगामाआधी पुरवठा वाढण्यावर सरकारचा भर


अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्रालयांकडून धान्य पेरण्यापासून ते त्यापासून अंदाजे किती उत्पादन होईल, याबाबतचा डेटा गोळा केला जात आहे. अन्नपदार्थांचा साठा वाढविण्यासाठी वस्तूंच्या खरेदीला गती देण्यात येत आहे. साखर, गहू, बाजारात कोणत्याही वस्तूची कमतरता भासणार नाही, यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, लवकरच सणासुदीचा हंगाम सुरू होणार आहे. यामुळे आगामी काळात साखर, हरभरा, गहू, मैदा, मैदा, तांदूळ, मूग यांसह इतर डाळींची मागणी उच्चांकावर असेल. येत्या काही महिन्यात सरकारला याबाबत नियोजन करावं लागणार आहे.वाढत्या मागणीनुसार योग्य पुरवठा करणे हे सरकारचे पहिले प्राधान्य आहे. याबाबत आराखड्यावर अन्न मंत्रालयाकडून काम सुरू आहे. 


तांदूळ आणि गव्हाच्या खरेदीला प्राधान्य


तांदूळ आणि गव्हाच्या खरेदीला प्राधान्य दिलं जात आहे, अशी माहिती अन्न मंत्रालयाने दिली आहे. चालू बाजार हंगाम 2022-23 मध्ये तांदूळ खरेदी आतापर्यंत 5.58 कोटी टन झाली आहे. दुसरीकडे, रब्बी वर्ष 2023-24 एप्रिल-मार्चमध्ये, आतापर्यंत 26.2 दशलक्ष टन गव्हाची खरेदी झाली आहे, ही गेल्या वर्षीच्या एकूण 18.8 दशलक्ष टन खरेदीपेक्षा जास्त आहे. गहू आणि तांदूळाच्या सध्याच्या खरेदीतून सरकारी साठ्यात पुरेसं अन्नधान्य असल्याची माहिती मंत्रालयाने दिली आहे. गहू आणि तांदूळ यांचा एकत्रित साठा 57 दशलक्ष टनांवर पोहोचला आहे, हा देशाच्या अन्नधान्याच्या गरजांसाठी समाधानकारक आहे.