Google Layoffs: आर्थिक मंदीचे सावट गडद होत असताना आयटी कंपन्यांमध्ये नोकरकपात सुरू करण्यात आली आहे. मेटामध्येदेखील नोकर कपात करण्यात आली आहे. आता, गुगलमध्येदेखील नोकर कपात होईल का, अशी चर्चा सुरू झाली आहे. गुगलची पॅरेट् कंपनी असलेल्या अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचई यांनी नोकरकपातीची शक्यता पूर्णपणे फेटाळून लावली नाही.


'वॉल स्ट्रीट जर्नल'ला त्यांनी दिलेल्या एका मुलाखतीत भाष्य केले. सुंदर पिचई यांनी म्हटले की, आम्ही सध्या आमच्याकडे असलेल्या संधीवर लक्ष केंद्रीत करत आहोत. आमच्याकडे बरेचसे काम शिल्लक आहे. पिचई यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI), चॅटबॉट बार्ड, जीमेल आणि गुगल डॉक्टसमध्ये बदल करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने काम सुरू असल्याचे त्यांनी म्हटले. आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे अतिशय महत्त्वाचे आहे. आमच्यासाठी सध्या हा प्राधान्यक्रमाचा मुद्दा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 


गुगलने कंपनी अधिक कार्यक्षम व्हावी यासाठी जानेवारी महिन्यात 12 हजार कर्मचाऱ्यांची कपात केली होती. कंपनीच्या कामाता अधिक सुसूत्रता यावी यासाठी ही कपात करण्यात आली असल्याचे त्यावेळी गुगलने म्हटले. 


सुंदर पिचाई यांनी 'वॉल स्ट्रीट जर्नल'ला दिलेल्या मुलाखतीत पुढे  म्हटले की, आम्हाला अधिक कार्यक्षमता वाढवण्यासाठी काय करता येईल, हे पाहत आहोत. आम्ही कामावर अधिक लक्ष केंद्रीत करत आहोत. मात्र, अजूनही बरेच काम शिल्लक असल्याचे त्यांनी सांगितले. 


गुगलकडून ऑपरेटिंग कॉस्टमध्ये 20 टक्क्यांची कपात करणार आहे का, याबाबत विचारले असता पिचाई यांनी म्हटले की, कपात होणार आहे. पण, नेमकं तसे शब्द नाहीत असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. आम्ही काही उद्दिष्ट निश्चित केली आहेत. दीर्घकालीन बचतीवर भर असल्याचे त्यांनी संकेत दिले. 


गुगलमध्ये लवकरच मोठा बदल, सर्च इंजिनला AI ची जोड


सर्च इंजिन गुगलमध्ये (Google) लवकरच मोठा बदल होणार आहे. गुगल सर्च इंजिनमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) सामावून घेतलं जाणार आहे. गुगलचे सीईओ (Google CEO) सुंदर पिचाई यांनी याबाबत वक्तव्य केलं. आता गुगल सर्च इंजिनमध्ये टाईप केलं तर चॅटजीपीटीसारखे (ChatGpt) उत्तर मिळणार आहे, द वॉल स्ट्रीट जर्नलमध्ये हे वृत्त प्रकाशित करण्यात आलं आहे. ChatGpt कडून तगडं आव्हान मिळाल्यानंतर  गुगलने हे पाऊल उचलले आहे, असं म्हटलं जातं. 


आर्टिफिशियल इंटेलिजन्समधील (AI) सुधारणेमुळे वेगवेगळ्या प्रकारच्या शोधांना प्रतिसाद देण्याच्या गुगलच्या (Google) क्षमतेमध्ये वाढ  होणार आहे, असे सुंदर पिचाई यांनी सांगितले. द वॉल स्ट्रीट जर्नलच्या वृत्तानुसार, सुंदर पिचाई यांनी म्हटले आहे की, भविष्यात गुगल सर्चमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) सपोर्ट केला जाईल, त्यानंतर शोध आणि निकाल अधिक चांगले आणि अचूक असतील.