Google CEO Sundar Pichai: संपूर्ण जगात महामंदी येणार अशी चर्चा सुरू झाली. तसा अंदाजही अनेकांनी वर्तवला. त्यानंतर जगभरातील अनेक कंपन्यांनी नोकरकपात (Layoff) केली.  कर्मचारी कपातीच्या लाटेत गुगलने (Google)  देखील  12 हजार कर्मचाऱ्यांना नारळ दिला. त्यानंतर आता गुगलचे सीईओ सुंदर पिचाई (Sundar Pichai) एक मोठा निर्णय घेणार आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, गुगल कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात करण्याच्या तयारीत आहे.


टाऊन हॉल येथे झालेल्या मिटिंगमध्ये गुगलच्या कर्मचाऱ्यांशी बोलताना पिचाई म्हणाले, वरिष्ठ पदावरील सर्व कर्मचाऱ्यांच्या वार्षिक बोनसमध्ये कपात करण्यात येणार आहे. सुंदर पिचाई यांच्या घोषणेनंतर आता कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनात देखील कपात होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गुगलने फक्त वार्षिक बोनसमध्ये कपातीची घोषणा केली आहे. मासिक पगारातील वेतनाबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही.


कपातीपूर्वी सुंदर पिचाई यांना मिळाली होती मोठी वेतनवाढ


वरिष्ठांच्या बोनस कपातीची टक्केवारी किती असेल आणि किती काळ तशीच राहिल याविषयी सुंदर पिचाई यांनी काही सांगितले नाही.  कर्मचारी कपातीच्या काही आठवड्यांपूर्वी पिचाई यांना मोठी वेतनवाढ मिळाली होती.  Google ची मूळ कंपनी अल्फाबेटकडून ही वाढ मिळाली होती. 2020 च्या एका रिपोर्टनुसार, पिचाई यांचे वार्षिक उत्पन्न जवळपास 2 मिलिअन डॉलर आहे. IFL हुरुन इंडिया रिच लिस्ट 2022 रिपोर्टनुसार, सुंदर पिचाई यांच्या नेटवर्थमध्ये 20 टक्क्यांनी खाली असून सध्या त्यांची नेटवर्थ 5,300  कोटी आहे.


12,000 कर्मचाऱ्यांना नारळ 


जागतिक मंदीच्या पार्श्वभूमीवर 20 जानेवारीला गुगलने 12,000 कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला. कर्मचाऱ्यांना दिलेल्या पत्रात गुगलने म्हटले होते की, गुगलला 25 वर्षे झाली आहे. परंतु, सध्या गुगल  कठीण परिस्थितीतून जात आहे. त्यामुळे आम्हाला हा निर्णय घ्यावा लागत आहे. 


कोणत्या कंपनीत किती कपात?  


ट्विटर (Twitter)  : एलन मस्क यांनी कंपनी ताब्यात घेतल्यापासून साधारण 50 टक्के कर्मचारी कपात केली आहे.


नेटफ्लिक्स (Netflix) : नेटफ्लिक्सलाही यंदा आर्थिक फटका बसलाय, कंपनीनं दोन टप्प्यात कर्मचारी कमी केले.


मेटा : फेसबुकची मूळ कंपनी मेटा कंपनी मोठी कर्मचारी कपात करण्याच्या तयारीत


अॅमेझॉन : ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉन 18 हजार कर्मचाऱ्यांना नारळ देणार आहे.  


सिगेट टेक्नॉलॉजिज : हार्ड ड्राईव्ह निर्मितीतल्या महत्वाच्या कंपनीनंही 3000 कर्मचारी कपात करण्यात आली आहे. 


इंटेल : 18  हजार कोटींची बचत करण्यासाठी जवळपास 20 टक्के कपातीची शक्यता आहे. 


मायक्रोसॉफ्ट : अपेक्षित उत्पन्न नसल्याने मायक्रोसॉफ्टने 10 हजार कर्मचाऱ्यांची कपात केली आहे.