Gold Rate Hike : सोन्या चांदीच्या दरात (Gold Silver Rate) सातत्यानं चढ उतार होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहेत. काल सोन्याच्या दरात काहीशी घसरण झाल्यानंतर आज मात्र, दरात वाढ झाली आहे. तर दुसऱ्या बाजूला चांदीच्या दरात घसरण झाली आहे. सोन्याच्या दरात वाढ झाल्यामुळं खरेदीदारांच्या खिशाला चांगलीच झळ बसत आहे. 
 
सीरियातील राजकीय गोंधळामुळे वाढलेल्या जागतिक तणावाच्या दरम्यान आठवड्याच्या पहिल्या व्यापार सत्रात सोन्याच्या दरात वाढ झाली आहे.  मल्टी कमोडिटी एक्सचेंज MCX वर, सोन्याचा भाव 182 रुपयांनी वाढला आहे. सध्या 10 ग्रॅम सोन्याचा दर हा 76801 रुपये आहे. जो गेल्या बंद सत्रात 76,619 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. म्हणजेच आजच्या सत्रात सोन्याच्या दरात 0.23 टक्के किंवा 182 रुपयांनी वाढ झाली आहे.


सोन्याच्या दरात वाझ, तर चांदीच्या दरात घट 


सोन्याचे भाव वाढत असताना चांदीच्या दरात घसरण होत आहे. एमसीएक्सवर चांदी 448 रुपयांनी किंवा 0.45 टक्क्यांनी घसरून 92023 रुपये प्रति किलो झाली. गेल्या सत्रात चांदी 92,448 रुपये प्रति किलोवर बंद झाली होती. सोन्याची वाढ जागतिक तुटीमुळे झाली आहे आणि 18 डिसेंबर 2024 रोजी यूएस फेडरल रिझर्व्हने व्याजदरात चतुर्थांश टक्के कपात करण्याच्या अपेक्षेमुळे देखील दिसून येत आहे.


व्याजदर कपातीमुळे सोन्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता


या आठवड्यात, भारतात 12 डिसेंबर 2024 रोजी किरकोळ महागाई दर डेटा जाहीर केला जाईल, तर बुधवारी, 11 डिसेंबर 2024 रोजी अमेरिकेत महागाई दर डेटा जाहीर केला जाईल. अमेरिकेत फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात करेल अशी अपेक्षा आहे, त्यामुळे येत्या काही दिवसांत सोन्याच्या किमतीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यावर, सीरियातील घटनेमुळे सोन्याचे भावही वाढू शकतात. फ्रान्समधील राजकीय अस्थिरता आणि रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे येत्या काही दिवसांत सोन्याचा भाव वाढू शकतो.