Nanded EVM News : सध्या EVM च्या मुद्यावरुन देशासह राज्यभरात चांगलच वातावरण गरम झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. या मुद्यावरुव विरोधक आणि सत्ताधारी आमने सामने येत असल्याचं पाहायला मिळत आहे. दोन्ही बाजूंनी ऐकमेकांवर टीका होत आहे. दरम्यान, महाराष्ट्रात देखील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी EVM वर संशय व्यक्त केला आहे. दरम्यान, अशातच नांदेड (Nanded) जिल्ह्यातील 75 केंद्रांवर ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची पडताळणी करण्यात आली आहे. मात्र, यामध्ये एकाही मताचा कुठे फरक आढळून आला नाही. याबाबतची माहिती नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली आहे.
निवडणूक आयोगाच्या सूचनेवरुन मतदानाची पडताळणी
निवडणूक आयोगाच्या सूचनेवरून प्रशासनाने प्रत्येक विधानसभा क्षेत्रातील 5 केंद्रांच्या ईव्हीएम मशीनवरील उमेदवारनिहाय मतांची व्हीव्हीपॅटशी जुळवणी होते काय? याची तपासणी केली होती. यामध्ये लोकसभेच्या 30 आणि विधानसभेच्या 45 अशा एकूण 75 मतदान केंद्रांवरील मतमोजणी बिनचूक निघाली आहे. कोणत्याही मतदान केंद्रावर मतांचा फरक दिसून आला नाही.
या मतमोजणीवेळी वेगवेगळ्या राज्यांतून आलेले वरिष्ठ सनदी अधिकारी असतात. हे निवडणूक निरीक्षक म्हणून असतात. त्यांच्यासमोर ही पडताळणी केली जाते.
नेमकी कशी करण्यात येते मतांची पडताळणी?
नांदेड जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदारसंघांतील प्रत्येकी 5 प्रमाणे 45 मतदान केंद्रांची व्हीव्हीपॅट पडताळणी करण्यात आली आहे. या सर्व 45 ठिकाणी व्हीव्हीपॅट व ईव्हीएम कंट्रोल युनिट यातील उमेदवारनिहाय मतांची आकडेवारी पूर्णतः जुळली आहे. तसेच लोकसभा पोटनिवडणुकीसाठी लोकसभेतील 6 विधानसभा क्षेत्रांतील प्रत्येकी 5 प्रमाणे 30 मतदान केंद्रांवरही एकाही मताचा फरक आढळला नाही. या 5 केंद्रांची निवड लॉटरी पद्धतीने उमेदवार, मतमोजणी प्रतिनिधी यांच्या समक्ष चिठ्ठी काढून झाली असल्याची माहिती जिल्ह्याधिकाऱ्यांनी दिली आहे.
माळशिरस मतदारसंघातील मारकडवाडी गाव केंद्रस्थानी
माळशिरस मतदारसंघातील मारकडवाडी गाव सध्या अनेकांच्या केंद्रस्थानी आहे. या गावाने EVM विरोधात आवाज उठवत बॅलेट पेपरवर मतदान घेण्यासाठी आंदोलन केलं होतं. 3 डिसेंबर बॅलेटवर मतदान घेण्याची तयारी केली होती. मात्र्, प्रशासनाच्या आदेशानंतर ही प्रक्रिया रद्द करण्यात आली होती. यानंतर काल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मारकडवाडी गावात जाऊन भेट दिली होती. येथील नागरिकांनी पुकारलेल्या बॅलेट पेपरवरील मतदान चळवळीला गती देण्याचं काम या माध्यमातून केलं आहे. मात्र, आता य मुद्यावरुन माळशिरस तालुक्यात राजकीय वातावरण चांगलच तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान,विरोधक ईव्हीएम विरोधात मोर्चा देखील काढणार आहेत.