जळगाव: गेल्या अनेक दिवसापासून स्थिर असलेल्या सोन्या-चांदीच्या भावामध्ये गेल्या दोन दिवसात मोठी घसरण झाली आहे. सोन्याच्या भावात तब्बल एक हजार रुपयांची घसरण होवून ते 48 हजार 400 रुपये प्रति तोळा झाले आहे. तर चांदीच्या भावात 2500 रुपयांची घसरण होवून चांदीचा भाव 63 हजार 600 रुपये प्रति किलो इतका झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा परिणाम सोन्या-चांदीच्या दरावर झाल्याने ही घसरण झाल्याचे सोने व्यावसायिकांनी म्हटलं आहे.
जळगाव ही सुवर्णनगरी म्हणून ओळखली जाते. सोन्याचे भाव कमी झाल्याने सुवर्णनगरीतील व्यवहारांवर त्याचा मोठा परिणाम झाल्याचं दिसून येतंय. सोन्या-चांदीच्या भावात आज झालेल्या घसरणीमुळे खरेदीसाठी महिलांसह नागरिकांनी सराफा दुकानांमध्ये गर्दी केल्याचे दिसून आले.
सोन्याचे भाव कमी झाल्याने त्याचा आनंद आहेह. दर कमी झाल्याने दागिन्यांची जास्तीत जास्त खरेदी करणार असल्याचं अनेक ग्राहकांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं.
तसेच भाव कमी झाल्याने अनेकांनी लग्नाच्या खरेदीसाठी दुकानांत एकच गर्दी केल्याचं दिसून आलं आहे. सोन्याचे भाव कमी झाल्याने आधी जेवढी खरेदी करणार होतो त्यापेक्षा जास्तीच्या दागिन्यांच्या खरेदी करणार असल्याचंही ग्राहकांनी सांगितलं.
जागतिक पातळीवर बँकांनी व्याज दरात काही प्रमाणात वाढ केल्याने अनेक गुंतवणूकदार हे सोन्याच्या गुंतवणूकीपासून अन्य ठिकाणी वळले आहेत. त्याचा परिणाम म्हणून सोन्याच्या आणि चांदीच्या मागणीत घट झाल्याने दर कमी झाले असल्याचं मत व्यावसायिकांनी व्यक्त केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या: