नवी दिल्ली : सोन्याच्या दरात 2025 च्या पहिल्या सहा महिन्यात मोठी वाढ झाली आहे. सोने दरानं 1 लाख रुपयांचा टप्पा पार केला आहे. सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांना या सहा महिन्यात मोठा लाभ झाला आहे. या सहा महिन्यात सोन्यात ज्यांनी गुंतवणूक केली त्यांना 27 टक्के परतावा मिळाला आहे. पहिल्या सहा महिन्यात सोन्यातील गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळाला असला तरी पुढील पाच महिने जपून गुंतवणूक करावी, असं काही तज्ज्ञांचं मत आहे.
गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय म्हणून सोन्यातील गुंतवणुकीकडे पाहिलं जातं. 2025 च्या पहिल्या सहा महिन्यात गुंतवणूकदारांना 27 टक्के परतावा मिळाला आहे. यानंतर देखील गुंतवणूकदारांना तज्ज्ञांकडून सोन्यातील गुंतवणूक विचारपूर्वक करण्याचा सल्ला दिला जात आहे. सोने दरातील तेजी दीर्घकाळापासून वाढत आहे. त्यामुळं काही काळासाठी तेजी थांबू शकते, त्यात घसरण पाहायला मिळू शकते, असा अंदाज तज्ज्ञांचा आहे.
पीटीआयच्या रिपोर्टनुसार, मेहता इक्विटीज लिमिटेडचे व्हाईस चेअरपर्सन राहुल कलंत्री यांनी सोने गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय म्हणून सर्वांच्या पुढे आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर पहिल्या सहा महिन्यांमध्ये सोने दरात 27 टक्के तेजी आली आहे. चालू आर्थिक वर्षात एप्रिल 2025 पासून गुंतवणूकदारांना 33 टक्के परतावा दिला आहे. इतर सर्व गुंतवणुकीच्या पर्यायांपेक्षा ही सोन्याची कामगिरी चांगली राहिली आहे. जागतिक आर्थिक स्थिती सुधारल्यानं सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळू शकते. त्यामुळं सध्या गुंतवणूकदारांनी सोन्यात नवी गुंतवणूक करण्यापासून दूर राहावं, असं तज्ज्ञांचं मत आहे.
मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसचे वरिष्ठ विश्लेषक मानव मोदी यांनी देखील अशाच प्रकारचं मत व्यक्त केलंय. मानव मोदी यांच्या मते सोन्याच्या दरातील तेजी लांबत चालली आहे. दर वाढण्यापूर्वी काही काळ स्थिरावू शकतात, सोन्याच्या दरात घसरण येऊ शकते. ज्याचा वापर दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी करताना होऊ शकतो. राहुल कलंत्री यांनी शॉर्ट टर्मसाठी गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांनी त्यांच्या पोर्टफोलिओत सोन्याऐवजी चांदीचा समावेश करण्याबाबत विचार करावा, असं म्हटलं आहे. उद्योगातील वाढ आणि आर्थिक विस्तारामुळं चांदीतून चांगला परतावा मिळू शकतो.
राहुल कलंत्री यांच्या मते येणाऱ्या सहा महिन्यात शॉर्ट टर्म फायदा मिळू शकतो. जोपर्यंत अमेरिकेच्या फेडच्या व्याज दरांच्या अपेक्षा किंवा जागतिक स्तरावरील जोखीम यात परिवर्तन होत नाही तोपर्यंत सोन्यातील गुंतवणूक सहा महिन्यांसाठी निगेटिव्ह बनली आहे.दरम्यान मागील आठवड्यात सोन्याचे दर एक लाखांच्या पार गेले होते.