Narendra Modi Speech On Operation Sindoor : पहलगाम हल्ल्यानंतर त्याचा बदला आम्ही घेतला, 22 एप्रिलच्या हल्ल्याचा बदला भारतीय सैन्याने 22 मिनिटात घेतला आणि दहशतवाद्यांना गाढलं असा पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. भारतीय सैन्याने केलेल्या हल्ल्यामुळे त्यांना पोसणाऱ्या आकांची आजही झोप उडाली असं नरेंद्र मोदी म्हणाले. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने सिंधू पासून ते सिंधूरपर्यंत हल्ला करत पाकिस्तानला धडा शिकवला असं नरेंद्र मोदी म्हणाले. 

Narendra Modi Speech : नरेंद्र मोदींचे भाषण

पहलगामवरील हल्ला म्हणजे भारताला हिंसेचा खाईत लोटण्याचं आणि देशात दंगे करण्याचा प्रयत्न होता. पण देशवासियांच्या एकीमुळे तो प्रयत्न फसला. आम्ही दहशतवाद्यांना मातीत गाढणार असा संकल्प मी त्यावेळी केला होता. या हल्ल्याची सजा दहशतवाद्यांना आणि त्यांना पोसणाऱ्यांना मिळणार. 22 एप्रिल रोजी हा हल्ला झाल्यानंतर मी परदेशातून लागोलाग आलो. त्या दिवशी एक बैठक बोलावली आणि दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देणार असा निश्चय केला.

आमच्या सैन्यबलाच्या संकल्पावर पूर्ण विश्वास आहे. त्यांना कारवाईसाठी पूर्ण मोकळीक दिली. त्यांनीच ठरवावं की कुठे आणि कधी हल्ला करायचा, सैन्याला सर्व अधिकार दिले. त्यानंतर सैन्याने अशी कारवाई केली की त्यामुळे दहशतवाद्यांना पोसणारे आजही थरथरतात.

पाकिस्तानी न्यूक्लिअर धमक्यांना भीक घालत नाही

भारतीय सैन्याने केलेल्या हल्ल्यामुळे पाकिस्तानी एअरबेस आजही आयसीयूमध्ये आहेत. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सैन्याने त्यांची ताकद दाखवली. पाकिस्तानने दिलेल्या न्यूक्लिअर धमक्यांना भारताने भीक घातली नाही.

या आधी दहशतवाद्यांना पोसणारे निश्चित असायचे. एखादा हल्ला केला तर त्या मागचे आका निवांत असायचे. पण आता त्या आकांना झोप येत नाही. त्यांना माहिती आहे, असं काही केलं तर भारत येईल आणि त्यांना सोडणार नाही. सिंधू पासून ते सिंदूरपर्यंत भारताने कारवाई केली आणि पाकिस्तानी दहशतवाद्यांना धडा शिकवला.

भारताला जगभरातून समर्थन, पण काँग्रेसचं समर्थन मिळालं नाही

भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर केवळ तीन देशांनी पाकिस्तानला पाठिंबा दिला. तर भारताच्या बाजूने जगभरातून पाठिंबा मिळाला. जगभरातून समर्थन मिळालं पण माझ्या देशातील विरांना काँग्रेसचं समर्थन मिळालं नाही हे दुर्दैव.

पहलगामच्या हल्यानंतर मोदींची 56 इंच छाती कुठे गेली असा प्रश्न विचारण्यात आला. दहशतवादी हल्ल्यानंतरही काँग्रेसने राजकारण केलं. काँग्रेसच्या स्वार्थी राजकारणामुळे देशाच्या सैन्यबलाचे मनोबल कमी होत होतं. काँग्रेसला ना भारताच्या समार्थ्यावर विश्वास आहे ना भारतीय सैन्यावर.

भारताचे ध्येय निश्चित, ते पूर्ण केलं

10 मे रोजी भारताने ऑपरेशन सिंदूर स्थगित करण्याची घोषणा केली. पण इथल्या काही लोकांनी सैन्यावर विश्वास न दाखवता अफवा पसरवण्यावर भर दिला.

सर्जिकल स्ट्राईकवेळीही असंच घडलं. त्यावेळी भारतीय सैन्याने पाकिस्तानमधील लष्करी तळं उद्ध्वस्त केली. बालाकोट एअर स्ट्राईकवेळीही दहशतवाद्यांच्या ट्रेनिंग सेंटरवर कारवाई केली, ते नष्ट केलं. ऑपरेशन सिंदूरवेळीही लक्ष्य निश्चित होतं. दहशतवाद्यांना ज्या ठिकाणाहून मदत मिळाली, ज्या ठिकाणी योजना तयार करण्यात आली त्या ठिकाणी हल्ला करण्यात आला.

पाकिस्तानने युद्ध थांबवण्याची विनंती केली

2 मेच्या मध्यरात्री आणि 10 मेच्या पहाटे, भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या अनेक तळांवर हल्ले केले. भारतीय सैन्याने असा हल्ला केला की पाकिस्तानने त्याचा विचारही केला नव्हता. त्यामुळे पाकिस्तान गुडघ्यावर आले. त्यावेळी पाकिस्तानचा पहिला फोन आला. डीजीएमओला पाकिस्तानकडून फोन आला आणि भारताला हल्ले थांबवण्याची विनंती केली.

ट्रम्प यांनी मध्यस्ती केल्याचं फेटाळलं

आमचा हल्ला निश्चित होता, आमचे ध्येय निश्चित होतं. भारताने ते लक्ष्य पूर्ण केलं. त्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर स्थगित केलं. जगातल्या कोणत्याही नेत्याने हा हल्ला थांबवण्यासाठी विनंती केली नाही हे मी जबाबदारीने सांगतोय.

9 मे रोजी अमेरिकेचे उपराष्ट्रपती हे सातत्याने मला फोन करत होते. तीन-चार वेळा फोन केल्यानंतर मी त्यांच्याशी संवाद साधला. त्यांनी सांगितलं की, पाकिस्तान मोठा हल्ला करण्याच्या तयारीत आहे. त्यावेळी मी त्यांना म्हणालो की, असं जर झालं तर पाकिस्तानला मोठी किंमत मोजावी लागेल. भारत त्यापेक्षाही मोठा हल्ला करेल. आम्ही गोळीला उत्तर गोळीने देणार.

काँग्रेस पाकिस्तानवर निर्भर होत चाललंय

पाकिस्तानने जर यापुढे असं काही केलं तर त्याला उत्तर दिलं जाईल. आजचा भारत हा आत्मविश्वासाने भरला आहे. आजचा भारत हा आत्मनिर्भर आहे. एकीकडे भारत गतीने पुढे जात आहे, पण दुसरीकडे काँग्रेस मतांसाठी पाकिस्तानवर निर्भर होत आहे. काँग्रेसकडून राजकारणासाठी जनतेमध्ये अविश्वास निर्माण केला जात आहे.

सैन्याला विरोध हा काँग्रेसचा इतिहास

सातत्याने भारतीय सैन्याच्या कामगिरीवर काँग्रेसने अविश्वास दाखवला आहे. देशाने नुकताच कारगिल विजय दिवस साजरा केला. पण काँग्रेसने कधीही कारगिर विजय दिवस साजरा केला नाही. ज्या वेळी डोकलाममध्ये भारतीय सैन्य धाडस दाखवत होतं, त्यावेळी काँग्रेसचे नेते कुणाकडून छुपी माहिती घेत होते हे सगळ्यांनाच माहिती आहे. आताही काँग्रेसने पाकिस्तानला क्लीन चिट दिली. पहलगामच्या हल्ल्यामागे पाकिस्तान असल्याचा पुरावा काँग्रेस मागत आहे. नेमकी हीच मागणी पाकिस्तान करत आहे. आज ज्यावेळी त्यांना सगळे पुरावे दिले तर त्यांची अवस्था बिथरल्यासारखी झाली आहे. 

काँग्रेसने पाकिस्तानने केलेले खोटे दावे पसरवले

भारतीय एअर डिफेन्स सिस्टिमने पाकिस्तानी ड्रोन नष्ट केले. 9 मे रोजी पाकिस्तानने एक हजार ड्रोन मिसाईलच्या माध्यमातून भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. हे मिसाईल भारताच्या कोणत्याही ठिकाणी पडू शकत होते. पण ते सर्व मिसाईल भारताने हवेतच नष्ट केले. भारतीयांना याचा अभिमान वाटला. पण काँग्रेसने पाकिस्तानने केलेले खोटे दावे पसरवण्याचा प्रयत्न केला.  

पाकव्याप्त काश्मीर कुणाच्या काळात पाकिस्तानने घेतला?

विकासासाठी आम्ही सामरिक सामर्थ्याचा वापर करत आहोत. राष्ट्रीय सुरक्षेसंबंधी काँग्रेसकडे आधीही धोरण नव्हते, यापुढेही नसेल. पाकव्याप्त काश्मीर का घेतलं नाही असा प्रश्न ते करतात. पण पाकव्याप्त काश्मीर हे पाकिस्तानच्या ताब्यात कुणाच्या काळात गेलं?

1962 आणि 1963 च्या दरम्यान, काँग्रेसचे नेते हे किशनगंगा, नीलम व्हॅली आणि काही परिसर पाकिस्तानला देण्याचा प्रस्ताव मांडत होते. 1966 मध्ये रण ऑफ कच्छच्या मुद्द्यावर काँग्रेसने मध्यस्तीचा प्रस्ताव स्वीकारला. 1965 च्या युद्धात हाजिपीर पास भारतीय सैन्याने ताब्यात घेतलं होतं. पण काँग्रेसने ते पुन्हा पाकिस्तानच्या ताब्यात दिलं. 1971 मध्ये पाकिस्तानचे 91 हजार सैन्य भारताच्या ताब्यात होते. पाकिस्तानची मोठी जमीन भारताच्या ताब्यात होती. भारत विजयाच्या स्थितीत होता. त्यावेळी जरासा प्रयत्न केला असता तर त्याचवेळी पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेतलं असतं. किमान कर्तारपूर साहिब कॉरिडॉर तरी भारताने ताब्यात घ्यायला हवा होता.

सियाचिनमधून भारतीय सैन्य मागे घेण्यासंबंधी काँग्रेस प्रयत्नशील होतं. भारतीयांनी त्यांना सत्ता दिली नाही, नाहीतर सियाचिनही भारताच्या ताब्यात नसतं. 2611 च्या हल्ल्यानंतरही काँग्रेसने पाकिस्तानसोबत बोलणी सुरू केली, त्यांच्यासोबत व्यापार सुरू केला. पण आम्ही पाकिस्तानचा व्हिसा बंद केला, अटारी वाघा बॉर्डर बंद केली.

सिंधू नदीच्या पाण्यावर पाकिस्तान मौजमजा करतोय

सिंधू पाणी वाटप करार काँग्रेसने केला, नेहरूंनी केला. भारतातून वाहणाऱ्या पाण्याचा करार करण्यात आला. हजारो वर्षांपासून भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट असलेल्या नद्यांच्या पाण्यावर नेहरु आणि काँग्रेसने पाकिस्तानसोबत करार केला. त्यामध्ये जागतिक बँकेला मध्यस्ती करण्यास सांगितलं. पाणी आमचं आणि निर्णय जागतिक बँक करणार?

भारतातून वाहणाऱ्या 80 टक्के पाण्यावर पाकिस्तानला अधिकार दिला आणि एवढ्या मोठ्या भारताला फक्त 20 टक्के पाणी ठेवलं. जो देश भारतावर हल्ला करतोय, दहशतवाद पसरवतोय त्याला 80 टक्के पाणी दिलं. या पाण्यावर पाकिस्तान मौजमजा करतोय. जर हा करार केला नसता तर या नद्यांवर अनेक मोठे प्रकल्प निर्माण करता येऊ शकले असते.

नेहरू एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी पाकिस्तानला कोट्यवधी रुपये दिले. नेहरुंनी पाकिस्तानच्या सांगण्यावरून एक अट स्वीकारली. सिंधू नदीवरील बांधामध्ये जी माती साचली जाते ते भारत स्वच्छ करु शकणार नाही. पाकिस्तानच्या मर्जीशिवाय भारत काहीही करु शकणार नाही ही अट नेहरुंनी मान्य केली.

नेहरूंनी केलेला हा सर्वात मोठा ब्लंडर आता भारताने सुधारला आहे. देशाचे अहित ज्यामध्ये आहे तो सिंधू करार आता रद्द करण्यात आला आहे. रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही.