Gold Price : तीन दिवसांच्या घसरणीनंतर आणि ख्रिसमसच्या दोन दिवस आधी, दिल्लीत सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. फेडच्या धोरणात्मक दराच्या घोषणेनंतर डॉलर निर्देशांकात घसरण झाल्यानंतर सोन्याच्या किमतीत वाढ झाली आहे. त्यानंतर सोन्याचा भाव 79 हजार रुपयांच्या जवळ पोहोचला आहे, तर चांदीचा भाव 90 हजार रुपयांवर पोहोचला आहे. येत्या काही दिवसांत डॉलरचा निर्देशांक जसजसा खाली येईल तसतसे सोन्याच्या किमतीतही वाढ होईल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. दुसरीकडे युक्रेन आणि रशियामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे सोन्याच्या भावालाही पाठिंबा मिळत असल्याचे दिसत आहे. 


दिल्लीत सोने-चांदी किती महागले?


देशाची राजधानी दिल्लीत सोमवारी सोन्याचा भाव 570 रुपयांनी वाढून 78,700 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. शुक्रवारी हा मौल्यवान धातू 78,130 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाला. 99.5 टक्के शुद्धतेच्या सोन्याचा भावही सोमवारी 570 रुपयांनी वाढून 78,300 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. शुक्रवारी शेवटच्या सत्रात तो 77,730 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाला होता. तर चांदीचा भाव 1,850 रुपयांनी वाढून 90,000 रुपये प्रति किलोवर पोहोचला. गेल्या ट्रेडिंग सत्रात पांढरा धातू 88,150 रुपये प्रति किलोवर बंद झाला होता. सध्या सुरू असलेल्या लग्नसराईच्या हंगामासाठी स्टॉकिस्ट आणि ज्वेलर्स यांनी केलेल्या मूल्य खरेदीमुळे सोने आणि चांदीच्या दरात वाढ झाली असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.


MCX वर सोन्याचे दर काय? 


सोमवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर फ्युचर्स ट्रेडिंगमध्ये फेब्रुवारी डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव 48 रुपये किंवा 0.06 टक्क्यांनी घसरून 76,372 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. तथापि, कमोडिटी एक्सचेंजवर, मार्च डिलिव्हरीसाठी चांदीचा भाव 637 रुपये किंवा 0.72 टक्क्यांनी वाढून 89,029 रुपये प्रति किलोवर पोहोचला. परदेशी बाजारात, कॉमेक्सवर सोन्याचे वायदे 6.70 डॉलर प्रति औंस किंवा 0.25 टक्क्यांनी घसरून 2,638.40 डॉलर प्रति औंस झाले. तथापि, आशियाई व्यापार सत्रात, कॉमेक्स चांदीचे वायदे 0.72 टक्क्यांनी वाढून US $ 30.18 प्रति औंसवर व्यवहार करत होते.


गेल्या अनेक दिवसांपासून सोन्याच्या दरात मोठी वाढ होत असल्याचा चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. यामुळं सर्वसामान्य नागरिकांना सोनं घेणं परवड नाही. मात्र, दुसऱ्या बाजूला मोठ्या संस्था, श्रीमंत लोक मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी करताना दिसत आहेत. कारण, सोन्यामध्ये केलेली गुंतवणूक नागरिकांना फायद्याची ठरत आहे. कारण दिवसेंदिवस सोन्याचे दर वाढतच आहेत. यामुळं सोन्यात केलेली गुंतवणूक फायद्याची ठरत आहे. दुसऱ्या बाजदुला सर्वसामान्य लोकांना सोन्याची खरेदी करणं शक्य नाही. त्यामुळं सोन्याच्या किंमती कधी कमी होणार असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे.