Gold Price : गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात (Gold Price) दिवसागणिक मोठी वाढ होताना पाहायला मिळतेय. 24 कॅरेट सोन्याचा दर आज तब्बल 56,650 रूपयांवर पोहोचला आहे. त्यामुळे ग्राहकांना सोनं खरेदी करताना अनेक गोष्टींची काळजी घेऊन सोनं खरेदी करावं लागतंय. सोन्या-चांदीचे वाढते दर हे सुवर्णनगरी जळगावसह पुण्यात तसेच महाराष्ट्रभर पाहायला मिळतायत.
सोन्याच्या दरात वाढ केल्याबद्दल व्यापाऱ्यांनी वेगवेगळी कारणं दिली आहेत. यामध्ये प्रामुख्याने चीनमध्ये कोरोनाचा वाढता संसर्ग, जागतिक बाजारपेठेत डॉलरचा वाढलेला दर तसेच अमेरिकन फेडरल बॅंकांचे व्याजदर आणि चौथे कारण म्हणजे अवघ्या काही दिवसांवर आलेला नाताळचा सण. या सगळ्या कारणांमुळे सोन्याच्या दराने उच्चांक पातळी गाठली आहे. तसेच, हीच जर परिस्थिती कायम राहिली तर आगामी काळात सोन्याच्या दरात आणखी वाढ होण्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
ग्राहकांकडून निराशा व्यक्त
भारतात सध्या सगळीकडे लग्नसराई सुरु आहे. या दरम्यान ऐन लग्नसराईच्या काळात सोन्याच्या दरात वाढलेल्या दरामुळे जरी व्यापारी वर्गावर फारसा मोठा परिणाम झालेला नसला तरी मात्र, सामान्य ग्राहकांकडून निराशा व्यक्त केली जात आहे. काही ग्राहकांनी वेट अॅन्ड वॉचची भूमिका देखील घेतल्याचे पाहायला मिळाले.
दुसरीकडे, पुण्यामध्ये देखील सोन्याच्या दरात विक्रमी वाढ झालेली बघायला मिळतेय. पुण्यात आज सोन्याचे दर हे 55 हजारांच्या वर गेलेले बघायला मिळतायेत. मात्र, सोन्याचे दर वाढलेले असूनही पुणेकरांचा सोने खरेदीचा उत्साह कमी झालेला नाही. सोन्याची खाण असलेला लक्ष्मी रोड आजही ग्राहकांनी गजबजलेला होता.
पुण्यातील सोन्याचे दर :
22 कॅरेट : 51,650 + 3% GST : 53,199
24 कॅरेट : 99.5 टक्के शुद्धता : 56,732
24 कॅरेट : 99.9 टक्के शुद्धता : 57,896
ऑक्टोबर महिन्यात सोन्याचा दर हा 51,000 प्रति तोळ्याच्या घरात होता. दोन महिन्यांत हा दर तब्ब्ल 7000 हजारांनी वाढला आहे.
कोरोना आणि आर्थिक अस्थिरतेच्या वातावरणात सोन्याकडे लोक सुरक्षित गुंतवणूक म्हणून बघतायत. पुढे देखील सोन्याचे दर हे वाढतच जाणार असल्याचं व्यापाऱ्यांकडून कळतंय. त्याच बरोबर लग्न किंवा सण असला की ग्राहकांची पाऊले आपोआप सोनं खरेदीकडे वलतायत. असं दृश्य काहीसं बाजारात पाहायला मिळतंय.
महत्त्वाच्या बातम्या :