Gold Price News : अमेरिकेचे फेडरल रिझर्व्ह लवकरच आपल्या व्याजदरात कपात करेल असा अंदाज अनेक दिवसांपासून वर्तवला जात होता. अखेर बुधवारी अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने आपल्या व्याजदरात 50 बेस पॉइंट्स म्हणजेच 0.50 टक्के कपात करण्याची घोषणा केली. विशेष म्हणजे कोरोना महामारीनंतर फेडरल बँक ऑफ अमेरिकाने महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी व्याजदरात वाढ केली होती. व्याजदरात वाढ केल्यानंतर फेडरल रिझर्व्हने व्याजदरात कपात करण्याची ही पहिलीच वेळ आहे. फेडरल रिझर्व्हच्या या घोषणेचा परिणाम जगभरात दिसून येत आहे. याचा परिणाम सोन्याच्या भावावर (Gold Price) झाला आहे. किंमतीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. सणासुदीच्या काळात सोनं 78000 रुपयांची पातळी ओलांडण्याची शक्यता आहे. 


अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने व्याजदरात कपात केल्याने सोन्याच्या किमतीवर परिणाम होत आहे. चार वर्षांच्या सतत उच्च व्याजदरानंतर, फेडरल रिझर्व्हने व्याजदरात अपेक्षेपेक्षा 50 बेस पॉइंट्सने कपात केली आहे. अमेरिकेतील बेरोजगारीच्या दरात घट झाल्यानंतर ही कपात करण्यात आली आहे.


सोन्याचे भाव वाढले


फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर कपातीच्या निर्णयाचा परिणाम सोन्याच्या किमतीवर लगेच दिसून येत आहे. तेव्हापासून सोन्याच्या दरात वाढ होताना दिसत आहे, पण याकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहण्याची गरज आहे. व्याजदर कपातीच्या निर्णयानंतर सोन्याचा भाव नवा उच्चांक गाठू शकतो. अशा परिस्थितीत तुम्ही सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर भविष्यात तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो.


सोन्याच्या मागणीत वाढ


येत्या काही दिवसांत भारतात सणासुदीला सुरुवात होणार आहे. करवा चौथ, धनत्रयोदशी आणि दिवाळीला लोक मोठ्या प्रमाणावर सोन्याची खरेदी करतात. यानंतर लग्नाच्या मोसमात सोन्याची मागणीही वाढते. त्यामुळं सोन्याच्या दरात वाढ झाल्यामुळे सोन्याच्या मागणीवर कोणताही परिणाम होणार नाही. नेहमीप्रमाणे या सणासुदीतही भारतीय लोक मोठ्या प्रमाणावर सोन्याची खरेदी करतील. या सणासुदीच्या हंगामात सोन्याच्या मागणीत 10 ते 15 टक्क्यांनी वाढ होऊ शकते, अशी त्यांना आशा आहे. सोनं 78000 रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.


चार दिवसात सोन्याच्या दरात 2 हजार रुपयांची वाढ


गेल्या चारच दिवसात सोन्याच्या दरात 2 हजार रुपयांची वाढ झाली असल्याचं पाहायला मिळत आहे. जागतिक पातळीवर अमेरिकन फेडरल बँकांनी आपल्या व्याजदरात कपात केल्याचा परिणाम म्हणून गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक सोन्याच्यामध्ये करण्यास सुरुवात केली आहे. मागणी वाढूनही सोन्याचे दर हे चारच दिवसात दोन हजार रुपयांनी वाढले आहेत. सध्या सोन्याचे दर हे 74600 वरून हे दर 76600 रुपयांच्या वर जाऊन पोहोचले आहेत. पुढील काळात सोन्याच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जातेय.  


महत्वाच्या बातम्या:


Gold Rate : चार दिवसात सोन्याच्या दरात 2000 रुपयांची वाढ, सध्या सोन्याचा दर किती?