नवी दिल्ली: भारत सोन्याचा सर्वात मोठा आयातक देश आहे. कोरोनामुळे सोन्याच्या या आयातीवर परिणाम झाल्याचं समोर आलं आहे. चालू वित्तीय वर्षातील एप्रिल ते नोव्हेंबर दरम्यान सोन्याच्या आयातीत 40 टक्क्यांची घसरण झाली असून ती 12.3 अब्ज डॉलरवर आली आहे.
सोने आयातीचा परिणाम देशाच्या चालू खात्याच्या तूटीवर (Current Account Deficit) पडतो. वाणिज्य मंत्रालयाच्या 2019-20 वर्षाच्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षी भारतात 20.6 अब्ज डॉलर इतक्या किंमतीचं सोनं आयात करण्यात आलं होतं. त्यात आता 40 टक्क्यांची घट होऊन ते 12.3 अब्ज डॉलर्सवर आलं आहे.
चांदीच्या आयातीतही एप्रिल ते नोव्हेंबर या दरम्यान 65.7 टक्क्यांची घसरण झाली असून ती 75.2 करोड डॉलर इतकी झाली. सोने-चांदीच्या आयातीतीत घसरणीमुळे देशाची व्यापारी तूट 2020-21 मधील एप्रिल ते नोव्हेंबर दरम्यान 42 अब्ज डॉलर इतक्यावर आली आहे. एका वर्षापूर्वी व्यापारी तूट 113.42 अब्ज डॉलर इतकी होती.
नोव्हेंबर महिन्यात देशाच्या निर्यातीत 8.74 टक्के घट होऊन ती 23.52 अब्ज डॉलरवर पोहोचली. यामध्ये पेट्रोलियम, अभियांत्रिकी, रासायनिक आणि हिरे आणि आभूषणे यांच्या निर्यातीत घट झाली. चालू वर्षातील पहिल्या आठ महिन्यात हिरे आणि आभूषणे उद्योगातील निर्यातीत 44 टक्के घट होऊन ती 14.30 अब्ज डॉलसवर पोहचली आहे. देशातील आयातही 13.32 टक्क्यांनी घसरुन ती 33.39 अब्ज डॉलर इतकी राहिली. यामुळे नोव्हेंबर महिन्यात व्यापारी तूट कमी होऊन ती 9.87 अब्ज डॉलर इतकी झाली.
भारतात वर्षाला 800 ते 900 टन सोन्याची आयात
भारत सोन्याचा जगातील सर्वात मोठा आयातक देश आहे. यामध्ये प्रामुख्याने ज्वेलरी उद्योगांसाठी सोन्याची आयात केली जाते. तसेच भारतात सोन्यातील गुंतवणूक ही सर्वात सुरक्षित गुंतवणूक समजली जाते. यामुळे दरवर्षी भारतात 800 ते 900 टन सोनं आयात केलं जातं.
संबंधित बातम्या: