Gautam Adani News : गौतम अदानी (Gautam Adani) हे आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत उद्योगपती आहेत. त्यांच्या संपत्तीत सुमारे 2 अब्ज डॉलरची म्हणजेच 16500 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. तरीदेखील त्यांना मोठा धक्का बसला आहे. संपत्ती वाढवल्यानंतर त्यांचे नेमके कोणते नुकसान झाले याबाबतची माहिती पाहुयात.
अदानी जगातील टॉप 15 अब्जाधीशांच्या यादीतून बाहेर
उद्योगपती गौतम अदानी यांच्या नेट वर्थमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळं पुढील काही वर्षांत अदानी हे एलन मस्क यांच्यानंतर जगातील ट्रिलियनेअर्सपैकी एक होतील, असा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र, त्यांच्या संपत्तीत वाढ झाली असली तरी त्यांचे मानांकन घसरले आहे. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सच्या आकडेवारीनुसार, सुमारे दोन अब्ज डॉलर्स कमावल्यानंतरही अदानी जगातील टॉप 15 अब्जाधीशांच्या यादीतून बाहेर पडले आहेत. मात्र, जगातील 100 अब्ज डॉलर्सची संपत्ती असलेल्या उद्योगपतींमध्ये त्यांचं स्थान काम आहे. ते सध्या जगातील 16 व्या क्रमांकाचे अब्जाधीश आहेत. त्यांची संपत्ती 100 अब्ज डॉलर्स आहे.
आशियातील दुसरे सर्वात श्रीमंत उद्योगपती गौतम अदानी यांच्या एकूण संपत्तीत 1.96 अब्ज डॉलर्स म्हणजेच 16,500 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. त्यानंतर त्यांची एकूण संपत्ती 100 अब्ज डॉलर झाली आहे. चालू वर्षात त्यांच्या एकूण संपत्तीत 16 अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे. विशेष बाब म्हणजे गौतम अदानी हे जगातील काही अब्जाधीशांपैकी एक आहेत ज्यांची संपत्ती 100 अब्ज डॉलर्स आहे. अलीकडच्या काळात गौतम अदानी यांच्या संपत्तीत घट झाली आहे. गेल्या एका महिन्यात त्यांच्या संपत्तीत 5 अब्ज डॉलर्सची घट झाली आहे. दरम्यान, येत्या काही दिवसांत अदानींच्या संपत्तीत आणखी वाढ झाली तर ते दिग्गज अब्जाधिशांना सहजासहजी मागे टाकतील आणि पुन्हा टॉप 15 च्या यादीत येतील.
मुकेश अंबानींच्या संपत्तीतही वाढ
दुसरीकडे, आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत 2 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. आकडेवारीनुसार, मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती 112 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. चालू वर्षात त्यांच्या संपत्तीत 15 अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे. मुकेश अंबानी आता जगातील 11 व्या सर्वात श्रीमंत उद्योगपती आहेत. टॉप 10 मध्ये प्रवेश करण्यासाठी त्याला सर्जी ब्रिनला मागे सोडावे लागेल. मुकेश अंबानी आणि ब्रिन यांच्या संपत्तीत 20 अब्ज डॉलर्सचा फरक आहे. मुकेश अंबानी यांनी रिटेल आणि टेलिकॉम आर्मचा आयपीओ आणल्यास त्यांच्या संपत्तीत मोठी वाढ होईल.
महत्वाच्या बातम्या: