Foreign Currency Reserves: भारतीय रिझर्व्ह बँकेनं (RBI)काल (16 फेब्रुवारी 2024) परकीय चलनाच्या साठ्याचा (Foreign Currency Reserves) डेटा जारी केला आहे. या आकडेवारीनुसार, परकीय चलनसाठ्यात 5.24 अब्ज डॉलरची घट झाली आहे. सध्या परकीय चलनसाठा 617.23 अब्ज डॉलरवर आला आहे. जो पहिल्या आठवड्यात 622.469 अब्ज डॉलर होता. आरबीआयच्या आकडेवारीनुसार परकीय चलन संपत्तीतही मोठी घट झाली आहे. विदेशी चलन संपत्ती 4.80 अब्ज डॉलरने घसरून 546.52 अब्ज डॉलर झाली आहे.


डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत 


दरम्यान, आरबीआयच्या सोन्याच्या साठ्यातही घट झाली आहे. आरबीआयचा सोन्याचा साठा 350 दशलक्ष डॉलरने कमी होऊन 47.73 अब्ज डॉलर झाला आहे. एसडीआरमध्येही घट झाली आहे आणि ती 55 दशलक्ष डॉलरने कमी होऊन 18.13 अब्ज डॉलरवर आली आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) मध्ये जमा केलेल्या साठ्यातही घट झाली आहे. ती 28 दशलक्ष डॉलर्सनी कमी होऊन 4.82 अब्ज डॉलरवर आली आहे. 16 फेब्रुवारी 2024 रोजी चलन बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत झाला आहे. रुपया 4 पैशांनी मजबूत झाला आहे. एका डॉलरच्या तुलनेत 83.01 च्या पातळीवर बंद झाला आहे. जो व्यापार सत्रापूर्वी 83.05 रुपयांच्या पातळीवर बंद झाला होता. दरम्यान, ऑक्टोबर 2021 मध्ये, म्हणजे सुमारे अडीच वर्षांपूर्वी, देशाचा परकीय चलनसाठा 645 अब्ज यूएस डॉलरच्या उच्चांकावर होता.


देशांतर्गत चलन स्थिर करण्यासाठी आरबीआय जेव्हा चलन बाजारात हस्तक्षेप करते तेव्हा विदेशी चलन मालमत्तेत मोठा बदल दिसून येतो. चलन बाजारातील हस्तक्षेपामुळं, परकीय चलन संपत्ती वाढते किंवा कमी होते. ज्यामुळं RBI च्या परकीय चलनाच्या साठ्यावर परिणाम होतो. देशाच्या परकीय चलन साठ्याला FOREX किंवा Foreign Reserve Exchange असंही म्हटलं जातंय. हा साठा परकीय चलनाच्या रुपात साठवला जातोय जेणेकरुन ही रक्कम आवश्यक त्यावेळी वापरता येईल. सध्या भारताचा परकीय चलन साठा हा डॉलरच्या स्वरुपात साठवला ठेवला जातोय कारण आंतरराष्ट्रीय स्तरावर डॉलर हे सर्वाधिक वापरलं जाणारं आणि विश्वासू चलन आहे.


महत्वाच्या बातम्या:


भारताचा परकीय चलनसाठा पुन्हा घटला, आता तिजोरीत शिल्लक किती?