नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून ईपीएफओ खात्यातील रक्कम वर्ग करण्याची किंवा पीएफ खात्यातून काढून घेण्याची प्रक्रिया यूपीआयद्वारे करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यूनिफाईड पेमेंटस इंटरफेसद्वारे पीएफ खातेदारांना त्यांच्या खात्यातील रक्कम काढण्याची सुविधा लवकरच उपलब्ध करुन दिली जाणार आहे. फायनान्शिअल एक्स्प्रेस या इंग्रजी वृत्तपत्रानं दिलेल्या वृत्तानुसार ईपीएफओनं एनपीसीआयसोबत चर्चा सुरु केली आहे. 


ईपीएफओची एनपीसीआयसोबत चर्चा


यूपीआयद्वारे पीएफ खात्यातील रक्कम काढण्यासंदर्भातील योजना राबवण्यासाठी ईपीएफओनं नॅशनल पेमेंटस कॉर्पोरेशन ऑफ इंडिया सोबत चर्चा सुरु केली आहे. यूपीआय प्लॅटफॉर्मवर ही सुविधा येत्या तीन महिन्यांमध्ये उपलब्ध होईल. ईपीएफओच्या 7 कोटी 40 लाख सब्स्क्रायबर्सला चांगली सेवा देण्यासाठी यूपीआय सुविधा उपलब्ध  करुन दिली जाणार आहे. 


सूत्रांच्या माहितीनुसार एकदा ईपीएफ यूपीआयशी लिंक केल्यानंतर खातेदार डिजीटल वॉलेटच्या पर्यायाद्वारे क्लेम केलेली रक्कम वापरु शकतात. ईपीएफओ पीएफ खात्यातून पैसे काढण्याची प्रक्रिया सोपी करण्यासाठी आरबीआय आणि व्यापारी बँकांच्या मदतीनं डिजिटल सिस्टीमची फेररचना करत आहे. 


ईपीएफ खात्यातील रक्कम काढण्याच्या प्रक्रियेत यूपीआयचा समावेश केल्याचा फायदा दुर्गम भागातील सबस्क्रायबर्सला होऊ शकतो. गेल्या 6 ते 7 महिन्यांमध्ये ईपीएफओकडून अनेक लक्षणीय बदल करण्यात आले आहेत. पेन्शन सेवेमध्ये सुधारणा, क्लेम मंजुरीची प्रक्रियेला दिशा देणे यासाठी माहिती तंत्रज्ञान यंत्रणा  विकसित करण्याचे काम सुरु आहे. 


ईपीएफओनं आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये 5 कोटी क्लेम मंजूर केले आहेत. ही आतापर्यंतची विक्रमी संख्या आहे. या क्लेमच्या माध्यमातून ईपीएफओनं 2.05 लाख कोटी रुपये खातेदारांना दिले आहेत. आर्थिक वर्ष 23-2024 मध्ये  4 कोटी 45 लाख  क्लेम सेटल करण्यात आले होते. त्याद्वारे खातेदारांना 1.82 लाख कोटी रुपये देण्यात आले होते. 


ऑटो सेटलमेंट प्रोसेसद्वारे केवळतीन दिवसात क्लेम सेटल केले जात आहेत.1 कोटी 87 लाख क्लेम ऑटो सेटेलमेंटद्वारे मंजूर करण्यात आले आहत. केंद्रीय श्रममंत्री मनसूख मांडवीय यांनी क्लेम ट्रान्सफर प्रक्रिया सोपी केली असल्याचं म्हटलं. आता केवळ 8 टक्के दाव्यांमध्ये नियोक्त्याच्या साक्षांकनाची परवानगी लागेल. 


ईपीएफओची रक्कम काढण्यासंदर्भात येत्या काही दिवसांमध्ये अनेक बदल केले जाणार आहेत. ईपीएफओ खातेदाराला एटीएम कार्ड सारखं स्मार्ट कार्ड दिलं जाईल. याद्वारे पीएफ खात्यातील शिल्लक रकमेपैकी 50 टक्क्यांपर्यंतची रक्कम एटीएम कार्डवरुन काढली जाणार आहे. ईपीएफओ 3.0 लाँच होईल तेव्हा अनेक बदल झालेले दिसून येतील. 


इतर बातम्या :