नवी दिल्ली : संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारातून ठराविक रक्कम ईपीएफओकडे जमा केली जाते. दरमहा कर्मचारी आणि तो ज्या संस्थेत काम करतोय त्या संस्थेकडून ईपीएफ आणि पेन्शन खात्यात रक्कम जमा करण्यात येते. नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी बचतीची महत्त्वाची योजना आहे. निवृत्तीसाठी निधी जमा करण्यासह ज्यावेळी पैशांची गरज निर्माण होते तेव्हा त्यातून पैसे काढता येतात. पीएफ खात्यातून पैसे काढण्यासंदर्भात काही नियम आहेत, त्या नियमांचं पालन करणं आवश्यक आहे. हे नियम पीएफ खात्यातून पैसे काढण्याची संख्या रक्कम यावर लागू असतात.

Continues below advertisement



पीएफ खात्यातून पैसे दोन प्रकारे काढता येतात. अंशत: रक्कम काढणे किंवा ॲडव्हान्स म्हणून रक्कम पीएफ खात्यातून काढणे. कर्मचारी जेव्हा नोकरीत असतो तेव्हा तो पैसे काढू शकतो. कर्मचारी नोकरी सोडल्यानंतर किंवा निवृत्तीनंतर पीएफ खात्यातून पूर्णपणे रक्कम काढू शकतो.


अंशत: रक्कम काढणे किंवा ॲडव्हान्स : पीएफ खात्यातून अंशत: रक्कम काढण्याची संख्या निश्चित नसते. मात्र, पैसे काढताना प्रत्येक वेळी योग्य कारण द्यावं लागतं वेगवेगळ्या कारणांसाठी पैसे काढण्याची संख्या वेगवेगळी असते.


लग्न किंवा मुलांचं शिक्षण : तुम्ही तुमच्या लग्नासाठी पीएफ खात्यातून पैसे काढू शकता. मात्र, यासाठी 84 महिने किंवा 7 वर्ष सेवा पूर्ण झालेली असणं आवश्यक असते. मुलांच्या शिक्षणासाठी देखील पैसे काढता येतात. मात्र, या कारणासाठी तीन वेळा पैसे काढता येऊ शकतात.


घर खरेदी, बांधकाम किंवा दुरुस्ती : घर खरेदी करण्यासाठी बांधकामासाठी एकदा पैसे काढता येऊ शकतात. घराच्या दुरुस्तीला देखील पैसे काढता येऊ शकतात. यासाठी काही अटींची पूर्तता करावी लागते. या सुविधेचा फायदा केवळ एकदा घेऊ शकता.


आजारपण : वैद्यकीय अडचण किंवा आजारपणाच्या कारणासाठी पैसे काढण्यावर मर्यादा नाही. कितीही वेळा पैसे काढता येऊ शकतात, मात्र प्रत्येक वेळी वैद्यकीय प्रमाणपत्र द्यावं लागतं.


पीएफ खात्यातून पूर्णपणे रक्कम काढण्याचे नियम


पीएफ खात्यातून पूर्णपणे रक्कम पूर्ण काढण्यासाठी दोन नियम आहेत. कर्मचाऱ्याच्या वयाची 58 वर्ष पूर्ण झाल्यानंतर पीएफची पूर्ण रक्कम काढता येऊ शकते. जेव्हा एखादा कर्मचारी नोकरी सोडते आणि सलग दोन महिने बेरोजगार असतो त्यावेळी पीएफची रक्कम पूर्ण काढता येऊशकते. याशिवाय एका महिन्यानंतर 75 टक्के रक्कम काढता येते. पीएफ खात्यातून पैसे काढण्यासाठी ईपीएफओच्या वेबसाईट किंवा उमंग एपमधून अर्ज करावा लागतो.