End Of Bansal Era: एका छोट्याशा खोलीतून सुरुवात करून फ्लिपकार्टला (Walmart Flipkart Deal)  मोठ्या उंचीवर नेणारे बन्सल ब्रदर्स म्हणजेच, फ्लिपकार्टची (Flipkart) ओळख. पण आता हीच ओळख पुसली गेली आहे. सचिन बन्सल (Sachin Bansal) आणि बिन्नी बन्सल  (Binny Bansal) यांची फ्लिपकार्टशी जोडली गेलेली नावं आता पूर्णपणे मिटली आहेत. म्हणजेच, आता बन्सल ब्रदर्सकडे फ्लिपकार्टचे काहीच हक्क राहिलेले नसून त्यांनी आपल्याकडील फ्लिपकार्टची मालकी पूर्णपणे विकली आहे. 


सचिन आणि बिन्नी बन्सल यांनी मिळून साधारणतः 16 वर्षांपूर्वी फ्लिपकार्टला जन्म दिला. फ्लिपकार्ट वॉलमार्टला विकल्यानंतर सचिन बन्सल आधीच कंपनीपासून वेगळे झाले होते. आता बिन्नी बन्सल यांच्या राजीनाम्यानं एका युगाचा अंत झाला आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. फ्लिपकार्टचे सह-संस्थापक बिन्नी बन्सल यांनी ई-कॉमर्स (E-commerce) कंपनीच्या संचालक मंडळाचा राजीनामा दिला आहे. फ्लिपकार्ट आणि बिन्नी बन्सल यांनी दोघांकडूनही निर्णयाला दुजोरा देण्यात आला आहे.


आता कंपनी ओपडोअरवर लक्ष देणार 


बिन्नी बन्सल आता OppDoor या कंपनीवर आपलं पूर्ण लक्ष देणार आहेत. बिन्नी यांनी संचालक मंडळातील पद सोडण्याचा घेतलेला निर्णय कंपनीतील संपूर्ण स्टेक विकल्यानंतर काही महिन्यांनी घेतला आहे. आता बिन्नी बन्सल पुन्हा ई-कॉमर्स क्षेत्रात प्रवेश करणार आहेत. त्यांच्यासोबत फ्लिपकार्ट सुरू करणारे सचिन बन्सल सध्या नवी (Navi) फिनटेक कंपनी चालवत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, राजीनामा दिल्यानंतर बिन्नी बन्सल काहीसे भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. ते म्हणाले की, "मला फ्लिपकार्ट समूहाच्या गेल्या 16 वर्षांतील कामगिरीचा अभिमान आहे. फ्लिपकार्ट सध्या मजबूत स्थितीत आहे. एक खंबीर नेतृत्व आणि पुढे जाणारा मार्गही कंपनीकडे आहे. कंपनी सक्षम हातात आहे, हे जाणूनच मी कंपनी सोडण्याचा निर्णय घेतला आहे."


फ्लिपकार्ट सीईओंनी बिन्नी बंसल यांचे आभार मानले 


फ्लिपकार्टचे कार्यकारी उपाध्यक्ष लेह हॉपकिन्स म्हणाले की, व्यवसाय संस्थापक म्हणून बिन्नी बन्सल हे ज्ञान आणि अनुभव यांचा मिलाप असलेली अनोखी पर्वणी देतात. 2018 मधील वॉलमार्टच्या गुंतवणुकीनंतरही ते संचालक मंडळात राहिले, हे आमचे भाग्य मानतो. त्यांच्या सल्ल्याचा आम्हाला खूप फायदा झाला. फ्लिपकार्टचे सीईओ कल्याण कृष्णमूर्ती म्हणाले की, "आम्ही बिन्नी यांचे आभारी आहोत."


गेल्या वर्षीच विकलेली संपूर्ण भागीदारी 


बिन्नी बन्सल, एक्सेल कंपनी आणि टायगर ग्लोबल मॅनेजमेंटनं गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये वॉलमार्टला त्यांचे सर्व स्टेक विकले होते. बिन्नी बन्सल यांनी आपले स्टेक विकून सुमारे 1.5 अब्ज डॉलर्स कमावलेत. मे 2018 मध्ये, वॉलमार्टनं 16 अब्ज डॉलर्समध्ये फ्लिपकार्टमधील 77 टक्के हिस्सेदारी खरेदी केल्यानंतर सुमारे 5 वर्षांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता. वॉलमार्टसोबतचा नॉन कम्पीट करार पाच वर्ष पूर्ण झाल्यानंतर 2023 मध्ये संपला. आता बिन्नी बन्सल पुन्हा ई-कॉमर्स क्षेत्रात नवी सुरुवात करण्याची शक्यता आहे. 


ऑपडोर ई-कॉमर्स कंपन्यांना एंड-टू-एंड सॉलूशन्स उपलब्ध करुन देणार 


बिन्नी बंसल यांची नवी कंपनी ऑपडोर (OppDoor) ई-कॉमर्स कंपन्यांना ड-टू-एंड सॉलूशन्स उपलब्ध करुन देऊन ग्लोबल लेव्हलवर काम करण्यासाठी मदत करेल. ते ई-कॉमर्स कंपन्यांना डिझाइन, उत्पादन, मानवी संसाधनं आणि बॅकएंड सपोर्ट प्रदान करेल. Opdoor सुरुवातीला यूएस, कॅनडा, मेक्सिको, युनायटेड किंगडम, जर्मनी, सिंगापूर, जपान आणि ऑस्ट्रेलियामधील ई-कॉमर्स कंपन्यांवर लक्ष केंद्रीत करणार असल्याची माहिती मिळत आहे.