Employees Bonuses : साधारणपणे एखादी कंपनी (company) आपल्या कर्मचाऱ्यांना (Employees) त्यांच्या कामगिरीच्या आधारावर बोनस (Bonuses) देते. अनेक वेळा टार्गेट पूर्ण झाल्यानंतरच बोनस देण्याचे कंपन्यांचे नियम असतात. पण अलीकडेच चीनच्या (china) गुआंगडोंग प्रांतातील डोंगपो या पेपर कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी एक वेगळी तरतूद केली आहे. कंपनीच्या नवीन उपक्रमा अंतर्गत जर कर्मचारी दरमहा 50 किमी धावत असेल तर तो पूर्ण मासिक बोनससाठी पात्र असणार आहे.
चीनच्या एका कंपनीनं आपल्या कर्मचाऱ्यांचे आरोग्य चांगलं राहावं यासाठी एक उपक्रम राबवला आहे. आपल्या 100 कर्मचाऱ्यांमध्ये हा उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमा अंतर्गत जर कर्मचारी दरमहा 50 किमी धावत असेल तर तो पूर्ण मासिक बोनससाठी पात्र असणार आहे. त्यामुळं बोनस मिळवण्यासाठी कर्मचाऱ्यांना आता एरका महिन्यात 50 किलोमीटर धावावं लागणार आहे.
आरोग्यदायी जीवनशैलीला चालना
कंपनीनं 100 कर्मचाऱ्यांमध्ये निरोगी जीवनशैलीला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्या व्यायामावर आधारित बोनस देण्याचा निर्णय घेतला आहे. उदाहरणार्थ, जर एखादा कर्मचारी दरमहा 50 किमी धावत असेल तर तो पूर्ण मासिक बोनससाठी पात्र असेल. समजा एखादा कर्मचारी 40 किमी धावला तर त्याच्यासाठी 60 टक्के बोनस आणि 30 किमी धावण्यासाठी 30 टक्के बोनस मिळणार असल्याचा निर्णय कंपनीनं घेतला आहे. कर्मचाऱ्यांनी एका महिन्यात 100 किमी पेक्षा जास्त धावल्यास त्यांना 30 टक्के अधिकचा बोनस देणार असल्याची घोषणा देखील केली आहे.
फोनद्वारे चाललेले अंतर ट्रॅक केलं जाणार
डोंगपो पेपरचे लिन झिओंग यांनी दिलेल्या माहितीनुसार आमचे कर्मचारी निरोगी असतील तरच माझा व्यवसाय टिकू शकेल. त्यामुळं गेल्या तीन वर्षापासून आम्ही आपल्या कर्मचाऱ्यांना खेळ आणि फिटनेसचा आनंद घेण्यासाठी प्रोत्साहित केले आहे. दरम्यान, प्रत्येक कर्मचाऱ्याचे चाललेले अंतर त्यांच्या फोनवरील अॅपद्वारे ट्रॅक केले जाणार आहे.
कंपनीच्या या नवीन धोरणास सकारात्मक प्रतिसाद, मात्र काही जणांची टीका
मिळालेल्या माहितीनुसार, डोंगपो पेपरचे कर्मचारी नवीन बोनस रचनेमुळं खूप खूश आहेत. कंपनी आता एका दगडात दोन पक्षी मारण्यात मदत करत असल्याचा त्याचा दावा कर्मचाऱ्यांनी केला आहे. आता ते निरोगी राहतील आणि त्यासाठी पैसेही मिळतील. कंपनीच्या या नवीन धोरणास सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. परंतू काही जणांचं असं म्हणणं आहे की, यामुळं कर्मचाऱ्यांमध्ये भेदभाव होऊ शकतो. याबाबत बोलताना एका व्यक्तीने सांगितले की, कंपनीचे धोरण चांगल्या हेतूने आहे. परंतू विद्यमान परिस्थिती किंवा आरोग्य-संबंधित समस्यांमुळं कर्मचाऱ्यांमध्ये भेदभाव होऊ शकतो. तर काही जणांनी कंपनीवर खूप जास्त बोनस मर्यादा घालून कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात आणल्याचा आरोप केला आहे. काही नेटिझन्सचा असा विश्वास आहे की कर्मचारी या उद्दिष्टांचा पाठपुरावा करून त्यांचे जीवन उध्वस्त करू शकतात.
महत्त्वाच्या बातम्या: