Vijaya Gadde: एलन मस्क यांनी ट्विटर विकत घेतल्यानंतर ट्विटर सतत चर्चेत आहे. मस्क यांनी आता 'ट्विटर फाइल्स' उघड केल्याने अमेरिकेच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत ट्वीटरने जाणीवपूर्वक काही गोष्टी लपवल्या असल्याचे दावा करण्यात येत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचे सुपुत्र हंटर बायडन यांच्याशी निगडीत काही गोष्टी ट्वीटरने जाणीवपूर्वक लपवल्याचा आरोप होत आहे. ट्वीटरच्या तत्कालीन अधिकारी विजया गड्डे यांचा सहभाग असल्याचा दावा करण्यात येत असून त्यांना अटक करण्याची मागणी होत आहे. 


मस्क यांची ट्वीटर फाइल्स


एलन मस्क यांनी मुक्त पत्रकार आणि लेखक मॅट टॅबी यांनी केलेले ट्वीट रिट्वीट केले आहे. यामध्ये हंटर बायडन यांच्या लॅपटॉपमधील स्टोरीबाबत ट्वीटरने सेन्सॉर केले होते. त्यामागे नेमकं कोण होते, ही सेन्सॉरशिप कशी झाली याचा उलगडा करण्यात आला आहे. 






हंटर बायडनचे प्रकरण काय?


अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका चुरशीच्या झाल्या होत्या. जो बायडन यांचा मुलगा हंटर बायडन यांच्या लॅपटॉपमधील अनेक गोष्टी उघडीकस आल्या होत्या. यामध्ये त्यांचे खासगी फोटो, व्हिडिओ यांचा समावेश होता. त्याशिवाय, कॉलगर्लवर किती खर्च झाला, याचीही धक्कादायक माहिती होती. हंटर बायडन यांचा लॅपटॉप दुरुस्तीसाठी गेला होता. त्यावेळी लॅपटॉपमधील या गोष्टी लीक झाल्याचे म्हटले जाते. याबाबतचे वृत्त अमेरिकेतील वृत्तपत्राने दिले होते. या प्रकरणाचा परिणाम अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीवर झाला होता. 


ट्विटर सेन्सॉर कसे केले? 


मुक्त पत्रकार मॅट टॅबीच्या म्हणण्यानुसार, न्यूयॉर्क पोस्टने 14 ऑक्टोबर 2020 रोजी हंटर बिडेनची बातमी प्रकाशित केली. यामध्ये हंटर बायडनच्या ई-मेलचा देखील हवाला देण्यात आला आणि ही बातमी सर्व पुराव्यांसह प्रकाशित करण्यात आली. त्यानंतर न्यूयॉर्क पोस्टने त्याची बातमी आपल्या ट्विटरवर शेअर केली. पण ही बातमी दडपण्यासाठी ट्विटरकडून हालचाली सुरू झाल्या. 


पत्रकार मॅट टॅबी यांच्या म्हणण्यानुसार, हंटर बायडनच्या बातम्यांचा प्रसार रोखण्यासाठी, ट्विटरने बातमीचे ट्विट डायरेक्ट मेसेजमध्ये पाठवण्याचा पर्याय बंद केला. त्यानंतर ही बातमी चाइल्ड पोर्नोग्राफीच्या श्रेणीत ठेवत बातमीला ब्लॉक करणे सुरू केले. 


ट्विटरने हंटर बायडनच्या कॉलगर्लची बातमी 'अनसेफ' कॅटेगरीत ठेवली आणि या बातमीशी संबंधित सर्व लिंक काढून टाकल्या. पत्रकार मॅट टॅबी यांच्या म्हणण्यानुसार, हंटर बायडनशी संबंधित ही सर्व पावले ट्विटरच्या अधिकाऱ्यांनी उचलली होती आणि ट्विटरचे तत्कालीन सीईओ जॅक डोर्सी यांना याबाबत माहिती देण्यात आली नव्हती. 


विजया गड्डे यांची महत्त्वाची भूमिका


भारतीय वंशाच्या ट्विटर अधिकारी विजया गडदे यांनी ट्विटरवर हंटर बायडनच्या बातम्या सेन्सॉर करण्यात सर्वात महत्त्वाची भूमिका बजावली होती. ट्विटरच्या लीगल, पॉलिसी आणि ट्रस्टच्या तत्कालीन प्रमुख विजया गड्डे होत्या. मस्क यांनी ट्वीटर खरेदी केल्यानंतर विजया गड्डे यांना ट्वीटरमधून काढण्यात आले. डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्वीटर अकाउंट सस्पेंड करण्यात विजया गड्डे यांची महत्त्वाची भूमिका होती. हंटर बायडनची बातमी दडपण्यामागे विजया गड्डे यांची भूमिका असल्याचे समोर आल्यानंतर आता त्यांना तुरुंगात डांबण्याची मागणी होत आहे.