US Share Market Fallen: अमेरिकन शेअर बाजारात (US Share Market) मागील दोन वर्षातील सर्वात मोठी पडझड दिसून आली. अमेरिकन शेअर बाजारात झालेल्या या पडझडीचा परिणाम आशियाई (Asian Share Market) आणि भारतीय शेअर बाजारावर (Indian Share Market) दिसून येण्याची शक्यता आहे. अमेरिकन शेअर बाजारातील तिन्ही प्रमुख निर्देशांकात जून 2020 नंतरची मोठी घसरण दिसून आली. अमेरिकेत महागाईने पुन्हा डोके वर काढल्याने बाजारात घसरण झाल्याचे म्हटले जात आहे. 


अमेरिकन शेअर बाजाराचा निर्देशांक डाओ जोन्समध्ये 1276 अंकांनी म्हणजे जवळपास 3.94 टक्क्यांच्या घसरणीसह  31,104.97 अंकांवर बंद झाला. एस अॅण्ड पी 500 निर्देशांकात 177.72 अंकांची म्हणजे जवळपास 4.32 टक्क्यांच्या घसरणीसह 3,932.69  अंकांवर बंद झाला. नॅस्डॅकमध्ये 632.84 अंकांनी म्हणजे 5.16 टक्क्यांच्या घसरणीसह 11,633.57 अंकांवर व्यवहार करत होता. 


ऑगस्ट महिन्यात अमेरिकेतील महागाईचा दर 8.3 टक्के इतका नोंदवण्यात आला. अमेरिकेतील महागाईचा दर हा अपेक्षेपेक्षा अधिक दिसून आल्याने बाजारात पडझड झाल्याचे दिसून आले. महागाईचा दर वाढल्याने अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्ह व्याज दर वाढ करण्याची शक्यता आहे. 


SGX Nifty मध्ये 1.5 टक्क्यांची घसरण


अमेरिकन शेअर बाजारात झालेल्या पडझडीचा परिणाम SGX Nifty सह आशियाई शेअर बाजारावर दिसून आला. बाजारात घसरण दिसून आली आहे. आज सकाळी SGX Nifty निर्देशांक 258 अंकांच्या म्हणजे 1.58 टक्क्यांच्या घसरणीसह 17807  अंकांवर व्यवहार करत होता. सिंगापूरच्या शेअर बाजारात 1.25 टक्के, जपानच्या शेअर बाजारात 2.09 टक्के, हाँगकाँगमध्ये 0.18 टक्के, कोरियन शेअर बाजारात 1.70 टक्क्यांची घसरण दिसून आली. 


आशियाई शेअर बाजारात होत असलेल्या घसरणीचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर होण्याची शक्यता आहे. भारतीय शेअर बाजाराची सुरुवात गॅप डाऊनने होण्याची शक्यता आहे. मागील दोन दिवस भारतीय शेअर बाजारात तेजी दिसत आहे. निफ्टीने चार महिन्यानंतर 18 हजार अंकांचा टप्पा गाठला. तर, मंगळवारी सेन्सेक्स 60,566 अंकांवर बंद झाला. शेअर बाजारातील व्यवहार थांबले तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक असलेला सेन्सेक्स 451 अंकांच्या तेजीसह 60,566 अंकांवर स्थिरावला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 130 अंकांच्या तेजीसह 18, 070 अंकांवर बंद झाला.