Diwali Muhurat Trading 2021 : आज देशभरात दिवाळीचा सण उत्साहात साजरा केला जात आहे. दिवाळीनिमित्त 4 नोव्हेंबर   (Diwali 2021 Date)  रोजी भारतीय शेअर बाजार बंद राहणार आहे. परंतु, यंदाही दरवर्षीप्रमाणे  मुहूर्त ट्रेडिंग (Muhurat Trading 2021) आयोजन करण्यात आलं आहे. दरम्यान, दिवाळी (Diwali 2021) बलिप्रतिपदेच्या दिवशीही शेअर मार्केट बंद असणार आहे. 


दिवाळीच्या दिवशी 1 तासासाठी सुरु होणार शेअर बाजार 


दरम्यान, दरवर्षीप्रमाणे यावर्षीही दिवाळीसाठी केवळ एका तासासाठी स्पेशल ट्रेडिंगचं आयोजन केलं जातं. या खास ट्रेडिंगला मुहूर्त ट्रेडिंग म्हणतात. या मुहूर्त ट्रेडिंगच्या निमित्तानं शेअर मार्केट एक तासासाठी सुरु होतो आणि गुंतवणूकदार एक छोटी गुंतवणूक करुन शेअर मार्केटमधील ट्रेडिंगची परंपरा निभावतात. दरम्यान, यावर्षी 4 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 6 वाजून 15 मिनिटं ते 7 वाजून 15 मिनिटांपर्यंत मुहूर्त ट्रेडिंगची वेळ आहे. तसेच 4 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 6 वाजल्यापासून 6 वाजून 8 मिनिटांपर्यंत प्री-ओपन ट्रेंड असणार आहे. असं म्हटलं जातं की, दिवाळीच्या दिवशी बाजारात गुंतवणूक करणं शुभ मानलं जातं. आजच्या दिवशी मुहूर्त ट्रेडिंगच्या निमित्तानं गुंतवणूकदार अधिकाधिक खरेदी करतात. 


Muhurat Trading 2021 Tips : या वर्षीही मार्केटमध्ये तेजी राहणार, 'हे' स्टॉक्स गुंतवणूकदारांना मालामाल करणार


आजच्या दिवशी ट्रेडिंग करणं अत्यंत शुभ 


अनेक वर्षांपासून शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंगची परंपरा सुरु आहे. असं म्हटलं जातं की, आजच्या दिवशी ग्रहांचा विशेष योग जुळून आल्यामुळं याच दिवशी मुहूर्त ट्रेडिंग करणं अत्यंत शुभ मानलं जातं. दरवर्षी दिवाळीच्या दिवशी मुहूर्त ट्रेडिंगसाठी खास वेळ निश्चित केली जाते. मुहूर्त ट्रेडिंगच्या वेळी गुंतवणूकदार एका खास प्रकारचा व्हॅल्यू बेस्ड स्टॉक खरेदी करतात आणि तो बऱ्याच काळासाठी स्वतःकडे ठेवतात. असं म्हटलं जातं की, हा स्टॉक स्वतःकडे ठेवल्यानं गुंतवणूकदाराला खूप फायदा होता. या दिवशी ग्रहांची स्थिती अशी असते की, ज्यामुळे आज गुंतवणूक करणं फायदेशीर ठरतं. 


दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी मातेची पूजा 


मुहूर्त ट्रेडिंगच्या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. त्यासोबतच नव्या व्यावसायाची सुरुवात केली जाते. हिंदू परंपरेनुसार, आजच्या दिवशी कोणतीही गुंतवणूक केल्यामुळं वर्षभर घरात धनसंपत्तीची कमतरता भासत नाही. त्यासोबतच ब्रोकर मुहूर्त ट्रेडिंगपूर्वी आपल्या हिशोबाच्या वहिची पूजा करतात आणि लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी प्रार्थना करतात.