Direct Tax Collection : पुढील महिन्यात सादर होणाऱ्या अंतरीम अर्थसंकल्पाआधी सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत सरकारला करातून चांगला महसूल मिळाला आहे. ताज्या आकडेवारीनुसार, चालू आर्थिक वर्षात सरकारच्या प्रत्यक्ष कर संकलनात (Direct Tax Collection) आतापर्यंत 19 टक्क्यांनी वाढ झाली असून तो 14.50 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेला आहे.
केंद्र सरकारने चालू आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये प्रत्यक्ष करातून 18.23 लाख कोटी रुपये मिळविण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. हे मागील आर्थिक वर्ष 2022-23 च्या 16.61 लाख कोटी रुपयांपेक्षा 9.75 टक्के अधिक आहे. प्रत्यक्ष करांमध्ये वैयक्तिक आयकर आणि कंपनी कर यांचा समावेश होतो.
किती मिळाला महसूल?
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) निवेदनात म्हटले आहे की, “परताव्यानंतर निव्वळ प्रत्यक्ष कर संकलन 14.70 लाख कोटी रुपये आहे. गेल्या आर्थिक वर्षात याच कालावधीत जमा झालेल्या प्रत्यक्ष कर संकलनापेक्षा हे प्रमाण 19.41 टक्के अधिक आहे. 2023-24 या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात निर्धारित केलेल्या प्रत्यक्ष कर अंदाजाच्या 80.61 टक्के आहे.
प्राप्तिकर विभागाच्या म्हणण्यानुसार, 1 एप्रिल 2023 ते 10 जानेवारी 2024 या कालावधीत करदात्यांना 2.48 लाख कोटी रुपये परत करण्यात आले आहेत. 10 जानेवारी 2024 पर्यंत स्थूल आधारावर प्रत्यक्ष कर संकलनात सातत्याने वाढ झाली आहे. एकूण कर संकलन 17.18 लाख कोटी रुपये होते. गेल्या आर्थिक वर्षातील याच कालावधीच्या तुलनेत हे प्रमाण 16.77 टक्के अधिक आहे. ग्रॉस कंपनी इन्कम टॅक्स (CIT) आणि वैयक्तिक आयकर मध्ये अनुक्रमे 8.32 टक्के आणि 26.11 टक्के वाढ झाली आहे.
परताव्यानंतर कंपनी आयकरात 12.37 टक्के आणि वैयक्तिक आयकरात 27.26 टक्के वाढ झाली आहे.