2000 Rupees Note : एटीएममधून आता 2000 रुपयांच्या नोटा फारच कमी वेळा येतात ही बाब तुमच्या लक्षात आली आहे का? मागील तीन वर्षात 2000 रुपयांच्या नव्या नोटा (2000 Rupee Banknote) छापलेल्या नाहीत हे यामागचं कारण असून शकतं. एका आरटीआयमध्ये (RTI) ही बाब समोर आली आहे. आयएएनएस या वृत्तसंस्थेने आरटीआय दाखल केला होता. 2019-20, 2020-21 आणि 2021-22 या तीन वर्षांमध्ये 2000 रुपयांची एकही नवी नोटा छापण्यात आली नसल्याचं यातून स्पष्ट झालं आहे.


आरबीआय (RBI) नोट मुद्रण (पी) लिमिटेडने 2016-17 या आर्थिक वर्षात 2000 रुपयांच्या 35429.91 कोटी नोटा छापल्या होत्या. यानंतर 2017-18 मध्ये अत्यंत कमी 1115.07 कोटी नोटा छापण्यात आल्या आणि त्यात आणखी कपात करुन 2018-19 मध्ये केवळ 466.90 कोटी नोटा छापण्यात आल्या, असं आरटीआयमधून समोर आलं. 2016 मध्ये नोटाबंदी (Demonetisation) लागू झाल्यानंतर 2000 रुपयांच्या नोटा चलनात आल्या होत्या.


तीन वर्षात 2000 रुपयांची एक नोट छापली नाही 
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया नोट मुद्रन (पी) लिमिटेडकडून मिळालेल्या आरटीआयच्या उत्तरात असं दिसून आलं की 2019-20, 2020-21 आणि 2021-22 या तीन आर्थिक वर्षांमध्ये 2000 रुपयांची एकही नोट छापलेली नाही. काळा पैसा आणि भ्रष्टाचारला आळा घालण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटाबंदी जाहीर केली होती. या निर्णयामुळे जुन्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्या. यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 500 आणि 2000 रुपयांच्या नोटा चलनात आणल्या होत्या.


2000 रुपयांच्या बनावट नोटांची संख्या वाढली
दरम्यान, संसदेत 1 ऑगस्ट रोजी दिलेल्या उत्तरात म्हटलं होतं की NCRB डेटानुसार, 2016 ते 2020 दरम्यान देशात जप्त करण्यात आलेल्या 2000 रुपयांच्या बनावट नोटांची संख्या 2,272 वरुन 2,44,834 वर पोहोचली आहे. आकडेवारीनुसार 2016 मध्ये देशात 2000 रुपयांच्या बनावट नोटांची संख्या 2,272 होती. 2017 मध्ये हे प्रमाण वाढून 74,898 झाले. यानंतर 2018 मध्ये ते 54,776 वर आले. 2019 मध्ये हा आकडा 90,566 आणि 2020 मध्ये 2,44,834 बनावट नोटा होत्या. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2015 मध्ये नवीन क्रमांकाच्या पॅटर्नसह महात्मा गांधी मालिका-2005 मध्ये सर्व मूल्यांच्या नोटा जारी केल्या होत्या. सहज पाहता येण्याजोग्या सुरक्षा वैशिष्ट्यांसह, सामान्य जनतेला बनावट नोटा सहज ओळखा येऊ शकतात.


चलनात आल्यापासून 2000 रुपयांच्या नोटांबाबत अफवा
दरम्यान 2000 रुपयांच्या नोटा चलनात आल्यापासूनच याविषयी अनेक अफवा पसरत होत्या. परंतु आरबीआयने 2000 च्या नोटा चलनातून बाहेर गेल्याची कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. अनेक अभ्यासकांच्या मते, 2000 च्या नोटेचं मूल्य जास्त असल्याने त्याचा वापर काळा पैसा आणि आर्थिक गैरव्यहारासाठी मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यातच गेल्या तीन वर्षात आरबीआयच्या 2000 रुपयांच्या नवीन नोटांची छपाई बंद केली आहे.


दोन हजारच्या नोटा चलनातून हद्दपार होणार? गेल्या वर्षीपासून छपाई बंद