DA Hike नवी दिल्ली: केंद्र सरकारकचे कर्मचारी आणि पेन्शनर्ससाठी महत्त्वाची अपडेट आहे. केंद्र सरकार राखी पौर्णिमेपूर्वी केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा महागाई भत्ता वाढवू शकते अशी शक्यता आहे. जानेवारीचा महागाई भत्ता 2 टक्क्यांनी वाढवण्यात आला होता. त्यावेळी महागाई भत्ता 53 टक्क्यांवरुन 55 टक्के झाला होता. मीडिया रिपोर्टनुसार सूत्रांच्या हवाल्यानं यामध्ये एक बदल होणार असून याची घोषणा लवकरच केली जाणार आहे.
महागाई भत्ता 3 टक्क्यांनी वाढणार?
सरकार लवकरच जुलै 2025 साठी महागाई भत्ता 3 टक्क्यांनी वाढवण्याची घोषणा करु शकतं. हा निर्णय प्रत्यक्षात आल्यास महागाई भत्ता 55 टक्क्यांनी वाढून 58 टक्के होऊ शकतो. ही घोषणा राखी पौर्णिमेपूर्वी केली जाण्याची अपेक्षा आहे. ही घोषणा राखीपौर्णिमेपूर्वी झाल्यास कर्मचारी आणि पेन्शनधारकांना ऑक्टोबरपर्यंत नव्या महागाई भत्त्याप्रमाणं रक्कम मिळेल. महागाई भत्ता एका वर्षात दोनवेळा बदलला जातो.
सातव्या वेतन आयोगाची मुदत 31 डिसेंबरला संपणार आहे. त्यामुळं सातव्या वेतन आयोगानुसार मिळणारा शेवटचा महागाई भत्ता असेल. डीएमधील बदल सीपीआयनुसार केले जातात. 12 महिन्यांची सरासरी सीपीआय म्हणचेच महागाई निर्देशांक काढला जातो.
महागाई भत्ता वाढवण्यासंदर्भातील घोषणा राखी पौर्णिमेपूर्वी केली जाईल,अशा चर्चा असल्या तरी केंद्र सरकारनं अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र, आर्थिक जाणकार आणि कर्मचारी संघटना महागाई भत्ता 3 टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा करत आहेत. एखाद्या कर्मचाऱ्याचं किमान वेतन 20000 हजार रुपये असेल तर त्याला महागाई भत्ता 55 टक्क्यांनुसार 11 हजार रुपये महागाई भत्ता मिळतो. यामध्ये 3 टक्क्यांची वाढ झाल्यास म्हणजेच 58 टक्के झाल्यास ही रक्कम 11600 रुपये होईल.
दरम्यान, केंद्र सरकारनं आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी दिली होती. मात्र, अद्याप आठव्या वेतन आयोगाचे अध्यक्ष आणि इतर सदस्यांची नियुक्ती करण्यात आलेले नाहीत. त्यामुळं केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांची प्रतीक्षा वाढली आहे.