मुंबई : आरबीआयने (RBI) क्रेडिट कार्ड्सचे (Credit Card) बील भरण्यासंदर्भात नवा नियम जारी केला आहे. या नियमानुसार क्रेडिट कार्ड्सचे बील हे आरबीआयच्या बीबीपीएस या प्राणालीच्या माध्यमातूनच भरावे लागणार आहे. त्यामुळे या नव्या नियमाचा परिणाम फोन पे, क्रेड, बीलडेस्क, इन्फिबिन यासारख्या फिनटेक कंपन्यांवर पडण्याची शक्यता आहे. हा नवा नियम 1 जुलैपासून लागू होणार आहे. म्हणजेच 30 जूननंतर वर नमूद केलेल्या माध्यमातून क्रेडिट कार्डचे बील देताना अडचण येऊ शकते. कारण 30 जूननंतर सर्व क्रेडिट कार्ड्सचे पेमेन्ट फक्त भारत बील पेमेन्ट सिस्टिम (बीबीपीएस) च्या माध्यमातूनच दिले जावेत, अशी सूचना याआधीच भारतीय रिझर्व्ह बँकेने दिली होती. 


....तर बील भरताना येणार अडचण


मिळालेल्या माहितीनुसार ॲक्सिस बँक, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय या बँकांनी अद्याप बीबीपीएस प्रणाली सक्रिय केलेली नाही. या बँकांनी आतापर्यंत पाच कोटींपेक्षा अधिक क्रेडिट कार्ड आपल्या ग्राहकांना दिलेले आहेत. त्यामुळे फोन पे, क्रेड  तसेच अन्य ॲप्सवरून या बँकांच्या क्रेडिट कार्डचे बील भरताना अडचण येऊ शकते. जोपर्यंत या बँका बीबीपीएस प्रणाली सक्रिय करणार नाहीत, तोपर्यंत वर नमूद केलेल्या ॲप्सच्या मदतीने क्रेडिट कार्ड्सचे बील भरता येणार नाही.   


कोणत्या बँकांचे किती कार्ड्स?


इकोनॉमिक्स टाइम्सच्या रिपोर्टनुसार एचडीएफसी बँकेने आतापर्यंत दोन कोटी क्रेडिट कार्ड्स जारी केलेले आहेत. आयसीआयसीआय बँकाने 1.7 कोटी क्रेडिट कार्ड्स जारी केलेले आहेत. अॅक्सिस बँकेचे एकूण 1.4 कोटी क्रेडिट कार्ड्स आहेत. या सर्व बँकांनी आतापर्यंत बीबीपीएस प्रणाली सक्रिय केलेली नाही. क्रेड, फेन पे या फिन टेक संस्थानी अगोदरच बीपीपीएस प्रणाली सक्रिय केलेली आहे. पण बँकांनीच ही प्रणाली सक्रिय न केलेल्यामुळे 30 जूननंतर या मंचांवरून क्रेडिट कार्ड्सचे बील भरताना अडचण येण्याची शक्यता आहे.


आणखी 90 दिवसांचा वेळ देण्याची मागणी


दरम्यान, हा नियम शिथिल करून बीबीपीएस प्रणाली चालू करण्यासाठी आणखी 90 दिवसांचा वेळ द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. एकूण 34 बँकांना क्रेडिट कार्ड देण्याची परवानगी आहे. पण आतापर्यंत यातील फक्त 8 बँकांनी बीबीपीएस ही प्रणाली सक्रिय केलेली आहे. बीबीपीएस प्रणाली सक्रिय असलेल्या बँकांमध्ये एसबीआय कार्ड, बीओबी कार्ड, इंडसइंड बँक, फेडरल बँक, कोटक बँक, महिंद्रा बँक या बँकांचा समावेश आहे.  


हेही वाचा :


एका दिवसात शेअर वाढला अन् झाला चमत्कार, अॅपल, मायक्रोसॉफ्टला मागे टाकत 'ही' कंपनी ठरली सर्वांत मोठी!