Crud Oil Price : रशिया-युक्रेनच्या युद्धाची झळ जगाला बसण्यास सुरुवात झाली आहे. कच्च्या तेलाच्या दराने आता मागील 9 वर्षातील उच्चांक मोडला आहे. फेब्रुवारी 2013 नंतर पहिल्यांदाच ब्रेंट क्रू़ड ऑइल दराने 118 डॉलर प्रति बॅरल इतका दर गाठला आहे. 


युक्रेनवर रशियाने हल्ल्याची तीव्रता वाढवली आहे. अमेरिका आणि अन्य देशांनी राखीव तेल साठ्यातून कच्च्या तेलाचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. तरीदेखील आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा दर उच्चांक गाठत आहे. 


फेडरल रिझर्व्ह बँक व्याज दर वाढवणार


फेडरल रिझर्व्ह बँकेचे प्रमुख जेरोम पॉवेल यांनी म्हटले की, अमेरिकेची मध्यवर्ती बँक या महिन्याच्या व्याज दरात वाढ करण्यासाठी तयार आहे. वर्ष 2018 नंतर व्याजदरात पहिल्यांदा ही वाढ होणार आहे. व्याज दरवाढीच्या वृत्तामुळे अमेरिकन शेअर बाजार वधारले होते. 


स्ट्रेटेजिक रिझर्व्हमधील तेलाचा वापर होणार


मंगळवारी, आंतरराष्ट्रीय ऊर्जा  संस्थेच्या (IEA) सर्व 31 सदस्य देशांनी आपल्या स्ट्रेटेजिक रिझर्व्हमधील तेल साठ्यातून 6 कोटी बॅरल तेलाचा वापरण्याचा निर्णय घेतला होता. रशिया आणि युक्रेन युद्धाचा परिणाम तेल साठ्यावर होणार नसल्याचा संकेत देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे म्हटले जाते. 


भारतात खाद्य तेलाच्या किंमतीत वाढ 


युक्रेन-रशिया संघर्षाचा भारतवरही परिणाम होत आहे. मागील चार महिन्यांपासून स्थिर असलेल्या खाद्यतेलाच्या भावात अचानक दोनच दिवसात वाढ झाली आहे. त्यामुळे आता सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धामुळे तेलाचे भाव वाढले आहेत. भारतात जवळपास 70 टक्के सूर्यफूल तेल युक्रेनमधून आयात केले जाते. पण युद्धामुळे या आवकेवर परिणाम झाल्याचे व्यापारी सांगत आहेत. तर काही भागात तेलाची साठेबाजी झाल्यामुळेही खाद्यतेलाचे भाव अचानक वाढले असल्याची माहिती जाणकारांनी दिली आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या: