अहमदनगर : शेवगाव तालुक्यात शेअर मार्केटमध्ये (Share Marketing) पैसे गुंतवणूक केल्यास जादा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत अनेकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. महिन्याला 12 ते 15 टक्के परतावा देतो अशी बतावणी करत शेवगाव तालुक्यात 200 पेक्षा जास्त एजंट तयार झाले. या तालुक्यातील 110 खेडेगावातून करोडोची माया जमवत यातील काही एजंट आता फरार झाले आहेत. या घटनेमुळे अहमदनगरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. 


नेमका प्रकार काय आहे? (Ahmednagar Share Market Scam)


मागील चार वर्षांपासून शेअर मार्केटचा हा काळा बाजार शेवगाव तालुक्यातील खेडोपाडी सुरू होता. दर महिन्याला 12 ते 15 टक्के परतावा देतो असं आमिष दाखवून जवळपास 200 पेक्षा जास्त एजंट्सने शेवगाव शहरात आपला काळा धंदा सुरू केला होता. या एजंट्सने दाखवलेल्या आमिषाला बळी पडून लोकांनी कोट्यवधी रुपये जमा केले होते. या एजंट्सने सुरुवातीला लोकांना परतावा दिला. नंतर मात्र हेच एजंट्स आपल्या संपूर्ण कुटुंबासह गावातून पळून गेले आहेत. मागील 4 वर्षांपासून हा गोरखधंदा शेवगाव तालुक्यात सुरू असून जवळपास एक हजार कोटींपेक्षा जास्त रकमेची फसवणूक झाल्याचा दावा केला जातोय.


शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल


या प्रकरणात प्रसार माध्यमांनी लक्ष घालताच पोलिसांवर दबाव वाढला आणि पोलिसांनी एक गुन्हा दाखल केला आहे. गदेवाडी येथील इन्व्हेस्टिंग डॉट कॉम या नावाने शेअर मार्केट ट्रेडिंग करणाऱ्या दोन सख्या भावांच्या विरोधात गुरुवारी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच इतर एजंट नॉट रिचेबल झाले असून काहींनी धूम ठोकली आहे. ज्ञानेश्वर ऊर्फ माउली अशोक धनवडे या शेतकऱ्याने शेवगाव पोलिसात फिर्याद दाखल केली असून या प्रकरणातील एका एजंटला पोलिसांनी सुरुवातीला आर्म ऍक्ट नुसार ताब्यात घेतले आणि नंतर त्याच्यावर कलम 420 प्रमाणे देखील गुन्हा दाखल केला आहे.


200 पेक्षा जास्त एजंट्सवर नेमकी काय कारवाई होणार?


या प्रकरणाची व्याप्ती वाढल्यास एमपीआयडी अंतर्गत गुन्हा दाखल होईल आणि गुंतवणूकदारांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळेल अशी अपेक्षा वकील तसेच तक्रारदारांकडून व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी या प्रकरणावर माध्यमांना प्रतिक्रिया देणे टाळले आहे. दुसरीकडे नागरिकांच्या अज्ञानाचा फायदा घेत आणि जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांना चुना लावणाऱ्या या 200 पेक्षा जास्त एजंट्सवर नेमकी काय कारवाई होणार असे विचारले जात आहे. दुसरीकडे नागरिकांनीदेखील कष्टाची कमाई कोठे गुंतवताना काळजी घेतली पाहिजे. अधिकृत व्यक्तीकडेच पैशांची गुंतवणूक करावी, असे सांगितले जात आहे. 


हेही वाचा :


Sheena Bora: शीना बोरा प्रकरणात नवा ट्विस्ट, शीनाच्या सांगाड्याचे अवशेष गायब; सीबीआयची कोर्टात धक्कादायक कबुली


मुंबईतील वाढते बांगलादेशी पोलिसांची डोकेदुखी? कायदेशीर प्रक्रियेचा आधार घेत भारतात वास्तव?


Solapur Crime : खोटे सोने आणि कागदपत्रं देऊन कॅनरा बँकेची 86 लाखांची फसवणूक, सोलापुरातील प्रकार