मुंबई : शेअर बाजारात आजही गुंतवणूकदारांचा खरेदीकडे कल दिसून आला असून सलग चौथ्या सत्रामध्ये बाजार वधारल्याचं चित्र आहे. आज बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये 629 अंकाची वाढ झाली तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये 180 अंकांची वाढ झाली. सेन्सेक्समध्ये आज 1.15 टक्क्यांची वाढ होऊन तो 55,397 अंकांवर पोहोचला आहे. तर निफ्टीमध्ये 1.10 टक्क्यांची वाढ होऊन तो 16,520 अंकांवर स्थिरावला. बँक निफ्टीमध्येही 251 अंकांची वाढ होऊन तो 35,972 वर पोहोचला आहे.


जागतिक स्तरावर सकारात्मक संकेत आणि गुंतवणूकदारांचा खरेदीकडे असलेला कल यामुळे शेअर बाजार वधारल्याचं चित्र आहे. अमेरिकन शेअर बाजार आणि आशियाई शेअर बाजारात दिसून आलेल्या तेजीमुळे भारतीय शेअर बाजारावर परिणाम झाला असून गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणावर खरेदीचा सपाटा लावल्याचं दिसून आलं.


आज शेअर बाजार बंद होताना 1857 कंपन्यांच्या शे्अर्समध्ये वाढ झाली आहे तर 1409 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घट झाली आहे. 128 कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही. आयटी इंडेक्समध्ये दोन टक्क्यांची वाढ झाली तर टेक महिंद्रा, ओएनसीजी आणि टीसीएससारख्या कंपन्यांच्या शेअर्समध्येही चांगली उसळी झाल्याचं दिसून आलं. ऑटो, उर्जा आणि रिअॅलिटी सेक्टरमध्ये काहीसा दबाव असल्याचं दिसून आलं. मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्येही काहीशी वाढ झाली आहे.


डॉलरच्या तुलनेत आजही रुपयाची घसरण झाली असून रुपयाची किंमत ही विक्रमी निचांकीवर म्हणजे 77.99 वर पोहोचली आहे. 


या कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ



  • Tech Mahindra- 3.75

  • ONGC- 3.64

  • HCL Tech- 3.11

  • TCS- 2.95

  • Reliance- 2.70


या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घट



  • HDFC Life- 2.00

  • M&M- 1.74

  • Eicher Motors- 1.06

  • Sun Pharma- 1.24

  • Adani Ports- 0.73