गोंदियाः गोंदिया जिल्ह्यातील आमगाव पोलिस ठाण्यात कार्यरत सहाय्यक पोलिस निरीक्षकासह एका खासगी इसमाना एक लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली. गोंदिया लाच लुचपत विभागाद्वारे ही कारवाई करण्यात आली. 37 वर्षीय श्रीकांत पवार असे लाचखोर सहाय्यक पोलिस निरीक्षकाचे नाव असून अनिल सोनकनवरे (वय 37) असे अटक करण्यात आलेल्या खाजगी इसमाचे नाव आहे.
तक्रारदार शेतकरी असून त्याचा आधी जमिन खरेदी विक्रीचा व्यवसाय होता. या दरम्यान त्याने सरकारी जमिन विकल्याची तक्रार प्राप्त झाल्याचे लाचखोर पोलिसाने शेतकऱ्याला फोनवर सांगितले होते. गुन्हा दाखल न करण्यासाठी लाचखोर सहाय्यक पोलिस निरीक्षक पवार याने 5 लाख रुपयांची लाचेची मागणी एका खासगी इसमाच्या माध्यमातून केली होती. दरम्यान तडजोडी अंती 2 लाख रुपये देण्याचे ठरले. मात्र तक्रारदार शेतकरी यांना लाच द्यायची नसल्याने त्यांनी गोंदिया लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली. तपासणीअंती गोंदिया लाचलुचपत विभागाने सापळा रचला आणि लाचेचा पहिला हप्ता म्हणून 1 लाख रुपये स्विकारताना सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकांत पवार व खाजगी इसम अनिल सोनकनवरे यांना रंगेहात अटक केली. एसीबीच्या या धडक कारवाईची चर्चा जिल्ह्यात होऊ लागली आहे.
तहसील कार्यालयात केली होती कारवाई
गोंदिया जिल्ह्यातील आमगाव येथेच जमिनीचे फेरफार करुन देण्यासाठी 6 हजार रुपयांची लाच स्वीकारताना महिला कारकूनला गोंदिया लाचलुचपत विभागाने अटक केली आहे होती. छाया वासुदेव रहांगडाले (वय 43) असे अटक करण्यात आलेल्या महिला लाचखोर कारकूनचे नाव होते. आमगाव येथे नागरिकांकडून लाचखोरी थारा देण्यात येत नसल्याचे या घटनांवरुन दिसून येत आहे.
नागरिकांनी पुढाकार घ्यावा
शासकीय कार्यालयात नागरिकांना लाचेची मागणी करण्यात आल्यास नागरिकांनी पुढाकार घेत लाच लुचपत विभागाकडे तक्रार दाखल करावी. लाचखोरीला थरा देऊ नये, असे आवाहन गोंदिया लाचलुचपत विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या