मुंबई: रिझर्व्ह बँकेने आपल्या रेपो दरात वाढ केल्याचा परिणाम आज शेअर बाजारावर झाल्याचं दिसून आलं. व्याज दरामध्ये वाढ झाल्यानंतर शेअर बाजारात काहीशी घसरण झाल्याचं चित्र आहे. आज शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्स 214 अंकांनी घसरला तर निफ्टीही 60 अंकांनी घसरला. सेन्सेक्समध्ये 0.39 टक्क्यांची घसरण झाली असून तो 54,892 अंकावर बंद झाला, तर निफ्टीमध्येही 0.37 टक्क्यांची घसरण झाली असून तो 16,356 अंकांवर बंद झाला.
आज शेअर बाजार बंद होताना 1541 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे तर 1734 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली आहे. 124 कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणताही बदल झाला नाही.
रिझर्व्ह बँकेने व्याज दर वाढवले
भारतीय रिझर्व्ह बँकेकडून आज नवीन रेपो दर जाहीर करण्यात आला. रिझर्व्ह बँकेने रेपो दरात 50 बेसिस पॉईंटने वाढ केली आहे. सध्या महागाईवर नियंत्रण मिळवण्यावर रिझर्व्ह बँकेचे प्रमुख लक्ष्य असल्याचे रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी सांगितले आहे. आरबीआयच्या नव्या पतधोरणानुसार आता रेपो दर 4.90 टक्के इतका झाला आहे. त्यामुळे कर्ज महागणार असून ईएमआयदेखील वाढणार आहे.
रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी सांगितले की, महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. महागाई सातत्याने वाढत असून युद्धाचा परिणाम जाणवत आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे महागाईचे जागतिकीकरण झाले असल्याचेही त्यांनी सांगितले. कोरोना महासाथीनंतरही अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी आरबीआय पावले उचलत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ
- Tata Steel- 1.71 टक्के
- SBI- 1.70 टक्के
- Titan Company- 1.34 टक्के
- Dr Reddys Labs- 1.33 टक्के
- BPCL- 1.14 टक्के
या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घट
- Bharti Airtel- 3.21 टक्के
- ITC- 2.19 टक्के
- Reliance- 1.76 टक्के
- UPL- 1.48 टक्के
- Asian Paints- 1.44 टक्के