नवी मुंबई : शहर व औद्योगिक विकास महामंडळ अर्थात सिडकोकडून परवडणाऱ्या घरांची निर्मिती आणि विक्री केली जाते. सिडकोकडून महागृहनिर्माण प्रकल्पाद्वारे एकूण 67 हजार घरांची निर्मिती केली जाणार आहे. यापैकी 26  हजार घरांच्या विक्रीसाठी माझे पसंतीचे सिडकोचे घर ही योजना राबवण्यात येत आहे. या योजनेतील घरांसाठी नोंदणी करण्याची आज शेवटची तारीख आहे. तर, पसंतीक्रम नोंदवण्याची प्रक्रिया कधीपासून सुरु होणार यासंदर्भात माहिती समोर आली आहे. 


नवी मुंबईतील विविध ठिकाणांवरील माझे पसंतीचे सिडकोचे घर या योजनेद्वारे 26 हजार घरांसाठी नोंदणी करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. आज नोंदणी संपल्यानंतर उद्यापासून पसंतीक्रम नोंदवण्याची प्रक्रिया सुरु केली जाणार आहे. त्यामुळं सिडकोच्या घरांसाठी ज्यांनी अर्ज केला असेल त्यांना उद्यापासून पसंतीक्रम नोंदवता येईल. 


पसंतीक्रम भरल्यानंतर बुकिंग शुल्क भरावं लागणार


पसंतीक्रम नोंदवल्यानंतर अर्जदारांना बुकिंग शुल्क भरावं लागणार आहे.आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील (EWS) अर्जदारांना 75000 + जीएसटी अशी रक्कम भरावी लागते. अल्प उत्पन्न गटातील अर्जदारांना 1 बीएचके सदनिकेसाठी रु.1,50,000, आणि अल्प उत्पन्न गटातील अर्जदारांना 2 बीएचके सदनिकेसाठी रु.2,00,000 (+ GST) बुकिंग शुल्क भरावे लागेल.


अंतिम यादी कधी प्रकाशित होणार?


सिडकोकडून बुकिंग रक्कमेची विंडो बंद झाल्यानंतर, पात्र ग्राहकांची मसुदा यादी प्रसिद्ध केली जाईल. ज्या ग्राहकांची नावे मसुदा यादीत नाहीत ते त्यांच्या हरकती यादी प्रकाशित झाल्यानंतर 7 दिवसांच्या आत त्यांच्या हरकती नोंदवू शकणार आहेत.  हरकतींचे निराकरण हे हरकती नोंदवण्याच्या तारखेनंतरच्या 7 दिवसांत केले जाईल. सर्व हरकतींचे निराकरण केल्यानंतर 5 दिवसांनी पात्र ग्राहकांची अंतिम यादी प्रकाशित केली जाईल. 


सोडत कधी?


सिडकोकडून सोडतीच्या तारखा नंतर जाहीर केल्या जातील. सोडतीची अंमलबजावणी झाल्यावर, यशस्वी अर्जदारांची यादी कामकाजाच्या 7-10 दिवसांत सिडको संकेतस्थळावर प्रदर्शित केली जाईल आणि यशस्वी विजेत्यांना इरादा पत्र' (लेटर ऑफ इंटेंट) जारी केले जाईल.


सिडकोकडून वाशी, तळोजा, खारघर, कळंबोली, कामोठे, पनवेल आणि उलवेमधील घरांच्या विक्रीसाठी माझे पसंतीचे सिडकोचे घर ही योजना आणली आहे. 


दरम्यान, सिडकोनं काही दिवसांपूर्वी या घरांच्या किमती जाहीर केल्यानंतर अर्जदारांमध्ये नाराजीचं वातावरण निर्माण झालं होतं. सिडकोच्या तळोजा येथील घराची किंमत 25 लाख तर खारघरमधील घराची किंमत 97 लाख रुपये आहे. 


इतर बातम्या :


Cidco Lottery 2024 : सिडकोचं सर्वात स्वस्त घर तळोजामध्ये, महाग घर खारघरमध्ये, 26000 घरांच्या किमती जाहीर, नोंदणी कशी करायची?