नवी मुंबई : शहर व औद्योगिक विकास महामंडळ म्हणजेच सिडकोकडून राज्यातील विविध शहरात घरांची निर्मिती केली जाते. सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात घरं उपलब्ध करुन देण्याचं काम सिडकोकडून करण्यात येतं. सिडकोनं माझे पसंतीचे सिडकोचे घर या योजनेद्वारे 26 हजार घरांची विक्री करण्यात येणार आहे. यासाठी नोंदणी प्रक्रियेला तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे. सिडकोनं काल नवी मुंबईतील विविध ठिकाणांवरील घरांच्या किंमती जाहीर केल्या आहेत. या घरांच्या किंमती 25 लाख रुपयांपासून 97 लाख रुपयांपर्यंत आहे. सिडकोचं सर्वात कमी किमतीचं घर तळोजा येथे आहे. तर, सर्वाधिक किमतीचं घर खारघर येथे आहे. खारघर रेल्वे स्टेशन सेक्टर अ च्या घराची किंमत 97.20 लाख रुपये आहे.
कोणत्या ठिकाणचं घर किती किमतीला?
कामोठे परिसरातील खांदेश्वर रेल्वे स्टेशन सेक्टर 28 या भागातील एक बीएचके म्हणजेच 322 चौरस फूट घराची किंमत 46.70 लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. या ठिकाणी 1470 घरं आहेत. मानसरोवर रेल्वे स्टेशन सेक्टर 39 येथील एक बीएचके म्हणजेच 322 चौरस फूट घराची किंमत 41.90 लाख रुपये आहे.
तळोजा सेक्टर 37 येथे 816 घरं असून याची किंमत 34.20 लाख रुपये आहे. तळोजा सेक्टर-28 येथे 2185 घरं असून एका घराची किंमत 25.10 लाख रुपये आहे. तळोजा सेक्टर 39 मध्ये एक बीएचके घराची किंमत 26.10 लाख रुपये असून इथं 7509 घरं आहेत.
पनवेल बस टर्मिनल सेक्टर 8 मधील घरांची किंमत 45.10 लाख रुपये आहे. इथं एकूण 172 घरं आहेत.
वाशी ट्रक टर्मिनल सेक्टर 19 येथे 3131 घरं आहेत. वाशीतील घरांची किंमत 74.10 लाख रुपये आहे.
खारघर बस टर्मिनल सेक्टर 14 मधील एक बीएचके घराची किमंत 48.30 लाख रुपये आहे. इथं एकूण 340 घरं आहेत. या घराचं क्षेत्रफळ 322 चौरस फूट आहे.
खारघर रेल्वे स्टेशन सेक्टर 1 अ येथील टू बीएचके घराची किंमत 97.20 लाख रुपये आहे. या घरांचं क्षेत्रफळ 540 चौरस फूट आहे. इथं एकूण 1803 घरं आहेत.
खारघर बस डेपो सेक्टर 14 मध्ये एक बीएचकेची 1700 घरं असून त्याची किंमत 48.30 लाख रुपये आहे.
कळंबोली बस डेपो सेक्टर 17 मध्ये 1360 घरं असून एक बीएचके घराची किंमत 41.90 लाख रुपये आहे.
उलवे येथे खारकोपर 2 ए सेक्टर 16 मध्ये 1 बीएचके घरांची किंमत 38.60 लाख रुपये आहे. खारकोपर 2 बी सेक्टर 6 येथे 288 घरं असून एका तिथल्या घराची किंमत 38.60 लाख रुपये आहे.
उलवे बामनडोंगरी सेक्टर 6 येथे 1700 घरं असून एका घराची किंमत 31.90 लाख रुपये आहेत.
उलवे खारकोपर सेक्टर 16 ए येथे 2113 घरं आहेत.इथल्या एका घराची किंमत 40.30 लाख रुपये आहे.
माझे पसंतीचे सिडकोचे घर योजनेच्या नोंदणीचे टप्पे
1.नोंदणीसाठी संकेतस्थळाला भेट द्या, तुमचे पूर्ण नाव आणि मोबईल क्रमांक प्रविष्ट करा.नोंदणीकृत मोबाईलवर आलेला ओटीपी प्रविष्ट करून लॉगीन करा.
2.आधार क्रमांक प्रविष्ट करून, आधार ओटीपी पडताळणी करा.
3.पॅनचे तपशील प्रविष्ट करा.
4.गट निवडा आणि सह-अर्जदाराचे तपशील भरा (लागू असल्यास) आणि सर्व स्वसाक्षांकित कागदपत्रे आणि प्रतिज्ञापत्र अपलोड करा.
5.एकवेळ भरावयाचे विनापरतावा नोंदणी शुल्क ₹236/- (GST सह) भरा व अर्ज जमा करा.
इतर बातम्या :