Foxconn Vedanta Deal: तैवानमधील कंपनी फॉक्सकॉनने (Foxconn) भारतीय कंपनी वेदांतासोबतच्या (Vedanta) सेमीकंडक्टर प्रकल्पातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. फॉक्सकॉनच्या या निर्णयामुळे खळबळ उडाली असताना दुसरीकडे केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी अधिकृत निवेदन जारी केले आहे. फॉक्सकॉनच्या या निर्णयाचा परिणाम भारताच्या सेमीकंडक्टर फॅब्रिकेशन प्लांटवर होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. सेमीकंडक्टरबाबत भारताने ठरवलेले लक्ष्य साधले जाईल असेही त्यांनी म्हटले. 


दोन्ही कंपन्या स्वतंत्रपणे करणार काम 


इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी ट्वीट करत म्हटले की, वेदांतासोबतच्या संयुक्त प्रकल्पातून फॉक्सकॉनने माघार घेतल्याचा परिणाम भारताच्या सेमीकंडक्टर फॅब्रिकेशन लक्ष्यांवर कोणताही परिणाम होणार नाही. 'वेदांत फॉक्सकॉन'ने गुजरातमध्ये सुमारे 1.5 लाख कोटी डॉलर अमेरिकन डॉलरच्या गुंतवणुकीसह भारतातील पहिले इलेक्ट्रॉनिक चिप उत्पादन युनिट स्थापन करण्याची घोषणा केली होती.


चंद्रशेखर यांनी म्हटले की, दोन खाजगी कंपन्यांनी भागीदारी करावी का किंवा भागिदार कंपनी कशी निवडतात किंवा न निवडतात यात दखल देणे सरकारचे काम नाही. मात्र, सोप्या शब्दात याचा अर्थ असा आहे की दोन्ही कंपन्या आता स्वतंत्रपणे भारतात त्यांची रणनीती पुढे करू शकतात." सेमिकॉन एन इलेक्ट्रॉनिक्समधील योग्य तंत्रज्ञान भागीदारासह भारतात व्यवसाय करू शकतात, असेही त्यांनी म्हटले. 


इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी पुढे म्हटले की, फॉक्सकॉन आणि वेदांता या दोन्ही कंपन्यांची गुंतवणूक महत्त्वाची आहे. आपल्यासाठी ते महत्त्वाचे गुंतवणूकदार असून रोजगार निर्मिती आणि विकासाला हातभार लावत आहेत. चंद्रशेखर यांनी पुढे म्हटले की, या दोन्ही कंपन्यांजवळ सेमिकॉनबाबतचा अनुभव अथवा तंत्रज्ञान नव्हते. या कंपन्यांना तंत्रज्ञानाशी निगडीत एक फॅक टेक भागिदार मिळण्याची अपेक्षा होती. त्यासाठी त्यांनी प्रयत्न देखील केले होते. मात्र, त्यांना योग्य कंपनी मिळाली नाही. 


 






फॉक्सकॉनची माघार


 सेमीकंडक्टर (SemiCondutor Project) उत्पादन करणारी कंपनी फॉक्सकॉनने (Foxconn) मोठा निर्णय घेतला आहे. भारतात सेमीकंडक्टर बनवण्यासाठी वेदांतासोबत (Vedanta) केलेला करार मोडण्याचा निर्णय फॉक्सकॉनने जाहीर केला आहे. मागील वर्षी वेदांता आणि फॉक्सकॉने गुजरातमधील 19.5 अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीसह सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले प्रोडक्शन कारखाना सुरू करण्याची घोषणा केली होती. या प्रोजेक्टवरून महाराष्ट्रातही राजकीय वातावरण तापलं होतं.