Gold Import Duty : आता सोने खरेदी महाग होणार आहे. केंद्र सरकारने सोन्यावरील मूळ आयात शुल्कात (Basic Import Duty on Gold) वाढ केली आहे. सोने आयात शुल्क आता 7.5 टक्क्यांहून वाढून 12.5 टक्के झाले आहे. भारतात मोठ्या प्रमाणावर सोने खरेदी करण्यात येते. सोने खरेदी कमी करण्यासाठी आयात शुल्कात वाढ करण्यात आली असल्याचे सरकारने म्हटले आहे. 


भारतात सर्वाधिक सोने खरेदी केले जाते. सोने खरेदी करण्यात भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो. भारतातील सोन्याची मागणी पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सोने आयात केले जाते. सोने आयातीमुळे रुपयावर मोठा दबाव पडतो. डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या मूल्याने ऐतिहासिक नीचांकी दर गाठला होता. रुपयाची होणारी घसरण आणखी कमी करण्यासाठी केंद्राचे प्रयत्न सुरू आहेत. त्यातच सोने आयात करावे लागत असल्याने सरकारला महागड्या डॉलरमध्ये सोन्याची किंमत द्यावी लागते. 


कोरोना महासाथीच्या काळात सोन्याची मागणी घटली होती. मात्र, कोरोनाची लाट काही प्रमाणात ओसरल्यानंतर मागील वर्षी सोने खरेदीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे दिसून आले. 


वर्ल्ड गोल्ड काउंसिलनुसार, वर्ष 2021 मध्ये भारताने मागील एक दशकातील सर्वाधिक सोने खरेदी केले होते. यंदाच्या मे महिन्यात सोने खरेदीत मोठी वाढ झाली होती. मे महिन्यात 107 टन सोन्याची आयात झाली होती. जून महिन्यातही  सोन्याची आयातीत मोठी वाढ झाली आहे. अर्थ मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सोन्याच्या आयातीत झालेल्या वाढीमुळे Current Account Deficit वर दबाव वाढ आहे. त्यामुळे सरकारने सोन्यावरील  आयात शु्ल्क वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोने खरेदीवर 3 टक्के जीएसटी वसूल केला जातो. 


मे महिन्यात देशात 6.03 अब्ज डॉलर मूल्या इतके सोन्याची आयात करण्यात आली आहे. भारतातील सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या आयातीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. देशांतर्गत सोने खरेदीच्या मागणीत घट करणे आणि महसूल वाढवण्यासाठी आयात शुल्कात वाढ करण्यात आली असल्याचे म्हटले जात आहे.