नवी दिल्ली : केंद्र सरकारने (Central Government) एकूण 150 वेगवेगळी औषधं बंद करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आता ताप, अंगदुखी यासारख्या त्रासावर घेतली जाणारी अनेक औषधं मिळणार नाहीत. विशेष म्हणजे सरकारने या औषधांवर तत्काळ प्रभावाने बंदी घातली आहे. बंद करण्यात आलेल्या औषधांची निर्मिती, विक्री, वाहतूक करण्यावरही बंदी असेल. या 150 पेक्षा जास्त औषधांवर संपूर्ण देशात बंदी असेल. 


तत्काळ प्रभावाने औषधांवर बंदी


केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने या औषधांच्या बंदीचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात एक सविस्तर सूचना जारी करण्यात आली आहे. कॉस्मेटिक्स अॅक्ट 1940 या कायद्यातील कलम '26 अ' अंतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे. बंदी घातलेल्या औषधांची निर्मिती, विक्री, वितरणावर बंदी घालण्यात आली आहे. तत्काळ प्रभावाने हा निर्णय लागू झालेला आहे. म्हणजेच आता एकूण 150 औषधांची निर्मिती, विक्री बंद करावी लागणार आहे. 


कोणकोणत्या औषधांवर बंदी? 


सरकारने बंदी घातलेल्या औषधांमध्ये ताप, अंगदुखी अशा सामान्य आजारांसाठी दिल्या जाणाऱ्या औषधांचाही समावेश आहे. उदाहरणादाखल सांगायचे झाल्यास एसिक्लोफेनॉक 50एमजी + पॅरासिटामोल 125एमजी प्रमाण असणारे औषध आता विकता येणार नाही. यासह मेफेनॅमिक अॅसिड + पॅरासिटामोल इंजेक्शन, सिट्राझीन एचसीएल + पॅरासिटामोल + फेनिलफ्रीन एचसीएल, लेवोसेट्रीजीन + फेनाइलफ्रीन एचसीएल + पॅरासिटामोल, पॅरासिटामोल + क्लोरफेनिरॅमाइन मॅलेट + फेनाईल प्रोपेनॉलामाइन तसेच कॅमिलोफिन डाइहायड्रोक्लोराईड 25एमजी + पॅरासिटामोल 300एमजी घटक असणाऱ्या औषधांच्या गोळ्या निर्माण, विक्री करण्यावर बंदी आणण्यात आली आहे.


पेनकिलकरवरही आता बंदी


केंद्रीय आरोग्य मंत्रायाने काढलेल्या अधिसूचनेनुसार पॅरासिटामोल, ट्रामाडोल, टॉरिन आणि कॅफीन यांचे कॉम्बिनेशन असलेल्या औषधी गोळ्यांवरही बंदी घालण्यात आली आहे. अशा प्रकारचे संयोजन असलेले औषध पेनकिलर म्हणून अंगदुखीसाठी घेतल्या जायच्या.   


औषधांवर बंदी कोणत्या आधारवर घातली जाते?


केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून वेळोवेळी शरीराला हानीकराक ठरणाऱ्या औषधांवर बंदी घातली जाते. कोणतीही चाचणी न करता एखाद्या औषधाची निर्मिती केलेली असेल किंवा योग्य प्रक्रिया पाळलेली नसेल तर अशा औषधांवर लगेच बंदी घातली जाते. एका तज्ज्ञ समितीकडून तसेच सल्लागार मंडळाकडून मिळालेल्या सूचनेनंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने वरील निर्णय घेतला आहे. याआधी सरकारने मार्च 2016 मध्ये वेगवेगळे संयोजन असलेल्या 344 औषधांवर तसेच जून 2023 मध्ये 14 औषधांवर बंदी घातली होती.


हेही वाचा :


ॲपलचा iphone 16 लवकरच बाजारात, लाँचिंग किंमत लीक; AI फिचर्सचं अपडेट व्हर्जन