Cement Price: जर तुम्ही घर बांधत असाल अथवा व्यावसायिक, निवासी मालमत्तेचे काम करत असाल तर तुमच्या खिशावर आणखी भार पडणार आहे. घरबांधणीत महत्त्वाचा घटक असणाऱ्या सिमेंटच्या दरात वाढ (Cement Price Hike) होण्याची दाट शक्यता आहे. सिमेंटच्या दरात वाढ झाल्यास बांधकाम, नूतनीकरण कामांसाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. 


नोव्हेंबर महिन्यात किंमतीत वाढ


देशभरात सिमेंटचे दर सातत्याने वाढत आहेत. ऑगस्ट महिन्यात सिमेंटच्या दरात 16 रुपये प्रति गोणी दर वाढले होते. वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, एम.के. ग्लोबल या वित्तीय सेवा कंपनीने नोव्हेंबर महिन्यात सिमेंटच्या दरात 6 ते 7 रुपये प्रति गोणी दरवाढ झाली असल्याचे म्हटले. 


डिसेंबरमध्ये ही दरवाढीची टांगती तलवार                                  


एम.के. ग्लोबलनुसार, भारतातील पश्चिम आणि मध्य भागातील राज्यांत सिमेंटचे दर स्थिर राहिले होते. तर, उत्तर, पूर्व आणि दक्षिण राज्यातील किंमतीत बदल दिसून आला. एका वृत्तानुसार, सिमेंट कंपन्यांकडून पूर्ण देशात प्रति गोणी मागे 10 ते 15 रुपयांची दरवाढ होण्याची मोठी शक्यता आहे. 


एमके ग्लोबलने म्हटले की, आगामी काही दिवसांमध्ये सिमेंटच्या दरवाढीबाबत मोठी माहिती समोर येण्याची शक्यता आहे. एसीसी आणि अंबुजा सिमेंट या कंपन्यांच्या आर्थिक वर्षातील बदल अपेक्षित आहे. त्याशिवाय, या कंपन्यांकडून होणारा सिमेंटचा पुरवठा डिसेंबर महिन्यात मर्यादित राहण्याची शक्यता आहे. हे दरवाढीसाठी सकारात्मक संकेत समजले जातात.
 
सिमेंट उद्योगात यंदा चांगली वाढ दिसून येणार असल्याचा अंदाज एम.के. ग्लोबलने व्यक्त केला. तिमाही ते तिमाहीच्या तुलनेत प्रति टन 200 रुपयांचा नफा होण्याची शक्यता आहे. आर्थिक वर्ष 2022-2023 मधील तिसऱ्या तिमाहीत सिमेंटचे दर वाढण्यासोबत उत्पादन खर्चदेखील वाढला असल्याचे एमके ग्लोबलने म्हटले आहे. 


भारतीय सिमेंट बाजारात सध्या आदित्य बिर्ला समूहाची अल्ट्राटेक सिमेंट कंपनी ही मोठी कंपनी आहे. अल्ट्राटेक कंपनीजवळ दरवर्षी 117 दशलक्ष टन सिमेंटचे उत्पादन करण्याची क्षमता आहे. अदानी समूहाने काही महिन्यांपूर्वीच एसीसी सिमेंट आणि अंबुजा सिमेंट कंपनी खरेदी केली होती. सिमेंट बाजारपेठेत एसीसी सिमेंटचा मोठा वाटा आहे. या दोन कंपन्या खरेदी केल्यानंतर सिमेंट उद्योगात अदानी समूह दुसऱ्या क्रमांकाची कंपनी झाली. या कंपन्यांची सिमेंट उत्पादन क्षमता 675 लाख टन इतकी आहे.