Varun Industries Bank Fraud Case: CBI नं मुंबई स्थित वरुण इंडस्ट्रीज लिमिटेडच्या (Varun Industries Ltd) संचालकांविरुद्ध दोन सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची 388.17 कोटी रुपयांची फसवणूक केल्याबद्दल दोन स्वतंत्र एफआयआर (FIR) नोंदवले आहेत. वरुण इंडस्ट्रीज लिमिटेड आणि कंपनीचे दोन संचालक किरण मेहता आणि कैलाश अग्रवाल यांच्यासह अन्य दोन अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही प्रकरणांमध्ये तक्रारदार ही केंद्रीकृत बँक असून आरोपींनी फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
पहिल्या प्रकरणात 269 कोटी रुपयांची फसवणूक आणि दुसऱ्या प्रकरणात 118 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे. एकूण 388.17 कोटी रुपयांची फसवणूक वरुण इंडस्ट्रीज लिमिटेडनं केल्याचं सीबीआयचं म्हणणं आहे.
सीबीआयनं (CBI) बुधवारी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईच्या वरुण इंडस्ट्रीज लिमिटेडविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला आहे. या फर्मवर सार्वजनिक क्षेत्रातील दोन बँकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. लाईव्ह मिंटनं दिलेल्या वृत्तानुसार, वरुण इंडस्ट्रीजवर या बँकांची 388.17 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.
TOI नं दिलेल्या वृत्तानुसार, एप्रिल 2023 मध्ये वरुण इंडस्ट्रीज लिमिटेडच्या दोन कंपन्या एक वरुण ज्वेल आणि दुसरी ट्रायमॅक्स डेटा सेंटरची सीबीआयमार्फत चौकशी करण्यात आली होती. बँकेच्या फसवणुकीच्या प्रकरणासंदर्भात ही चौकशी करण्यात आली होती. वरुण ज्वेलनं पीएनबीकडून कर्ज घेऊन त्यांच्या खात्यात 46 कोटी रुपये ट्रान्सफर केल्याचा आरोप आहे. यानंतर वरुण ज्वेलचं खातं एनपीए झालं आहे.
PNB बँकेचं किती नुकसान?
कंपनीचं खातं एनपीए झाल्यानंतर पीएनबीला 63 कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. कंपनीनं पीएनबीकडून कर्ज घेऊन 8 कोटी रुपये मॉरिशसमधील सहाय्यक कंपनीला हस्तांतरित केल्याचा आरोप आहे.
'या' बँकेकडूनही घेतलं कर्ज
वरुण इंडस्ट्रीजची दुसरी कंपनी ट्रायमॅक्स आयटी इन्फ्रास्ट्रक्चर अँड सर्व्हिसेसशी संलग्न असलेल्या ट्रायमॅक्स डेटासेंटर सर्व्हिसेसनं 2014 मध्ये बँक ऑफ महाराष्ट्रकडून (Bank Of Maharashtra) 29 कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं आणि अनेकांना पैसे हस्तांतरित केले होते.
ट्रायमॅक्स आयटीला 190 कोटींचं कर्ज
त्यानंतर कंपनीनं इतर अनेक बँक खात्यांमधून पैसे काढले आणि राउटिंग सेलद्वारे होल्डिंग कंपनीच्या खात्यात पैसे हस्तांतरित केले. अशा परिस्थितीत 2018 मध्ये त्याचं खातं एनपीए झालं. ट्रायमॅक्स आयटीनं 190 कोटी रुपयांचे कर्ज मिळवून निधीचा गैरवापर केला आणि त्याचं खातं 2017 मध्ये एनपीए झाल्याचा आरोप आहे. चौकशीनंतर सीबीआयनं वरुण इंडस्ट्रीजविरोधात गुन्हा दाखल केला आहे.