Union Budget 2024 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन (Finance minister Nirmala Sitharaman) यांनी मोदी 3.0  सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात निर्मला सीतारमन यांनी सगळ्याच घटकांसाठी मोठ्या घोषणा केल्या.  लोकसभेत अर्थसंकल्प सादर होत असताना दुसरीकडे शेअर बाजारात नकारात्मक वातावरण दिसून आले. गुंतवणूकदारांनी केलेल्या विक्रीच्या सपाट्यामुळे सेन्सेक्स (Sensex) आणि निफ्टी (Nifty) निर्देशांक घसरण नोंदवण्यात आली. कॅपिटल गेन टॅक्सवर घेतलेल्या निर्णयामुळे बाजारात घसरण झाली असल्याचे म्हटले जात आहे.  दरम्यान, जवळपास 1000 अंकांच्या घसरणीनंतर थोड्या वेळात बाजार सावरण्यास सुरुवात झाली. 


अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी  सकाळी सेन्सेक्स निर्देशांक 80,400 च्या आसपास तर निफ्टी 24,450 च्या आसपास होता. याआधी शेअर बाजाराची सुरुवात तेजीने झाली होती.सेन्सेक्स 200 हून अधिक अंकांनी वधारला. तर, निफ्टी 70 अंकांनी वधारला होता. मिडकॅप निर्देशांकात 300 अंकांची चांगली वाढ होऊन सेन्सेक्स 222 अंकांच्या वाढीसह 80,724 वर उघडला. निफ्टी 59 अंकांनी वाढून 24,568 वर उघडला. बँक निफ्टी 231 अंकांनी वाढून 52,511 वर उघडला होता.


बाजारात घसरण...


अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांचे अर्थसंकल्पीय भाषण सुरू असताना बाजारात घसरण होण्यास सुरुवात झाली. निर्मला सीतारमन यांच्या अर्थसंकल्पीय भाषणानंतर सेन्सेक्स 850 अंकांनी घसरला. तर, निफ्टी निर्देशांक 258 अंकांनी घसरला. बँक निफ्टी निर्देशांकात 600 अंकांची घसरण दिसून आली. निफ्टी मिडकॅपमध्ये 1400 अंकांची घसरण नोंदवण्यात आली. स्मॉलकॅप निर्देशांकही 600 अंकांनी घसरला. 


बाजारात घसरण का?


या अर्थसंकल्पाने शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना मोठा धक्का दिला आहे. भांडवली नफा कर अंतर्गत, दीर्घकालीन भांडवली नफा 2.50 टक्क्यांवरून 12 टक्के करण्यात आला आहे. त्याच वेळी, निवडलेल्या मालमत्तेवर अल्प मुदतीचा भांडवली नफा कर (STCG) 20 टक्के करण्यात आला आहे. याच्या परिणामी बाजारात घसरण सुरू असल्याचे दिसून आले आहे. 


 


>> इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये मोठे बदल


केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी अर्थसंकल्पात कर प्रणालीबाबत महत्त्वाच्या घोषणा केल्या. जुन्या करणप्रणालीनुसार कर भरणाऱ्या नोकरदारांसाठी कोणताही बदल करण्यात आलेला नाही. नव्या करणप्रणालीचा अवलंब करणाऱ्या नोकरदरांचे 17500 रुपये वाचणार आहेत. नव्या करप्रणालीत स्टँटर्ड डिडक्शनची मर्यादा 50 हजारावरुन 75 हजारापर्यंत वाढवण्यात येणार आहे. तर फॅमिली पेन्शन डिडक्शनची मर्यादा 15 हजारावरुन 25 हजार रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे.


>> नव्या करप्रणालीनुसार कर रचना कशी?


- 3 लाख रुपये - कोणताही कर नाही
- 3 लाख ते 7 लाख रुपये - 5 टक्के 
- 7 लाख ते 10 लाख रुपये - 10 टक्के 
- 10 लाख ते 12 लाख - 15 टक्के
- 12 लाख ते 15 लाख - 20 टक्के 
- 15 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न - 30 टक्के