Union Budget 2023: अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) 1 फेब्रुवारी 2023 रोजी मोदी सरकारच्या (Modi Government) दुसऱ्या टर्मचा शेवटचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या आगामी अर्थसंकल्पातून करदात्यांना तसेच रेल्वे आणि इतर क्षेत्रांना मोठ्या आशा आहेत. गेल्या काही वर्षांपासून सरकारनं अर्थसंकल्पात करदात्यांना दिलासा दिलेला नाही. अशा परिस्थितीत आगामी अर्थसंकल्प 2023 मध्ये कर आकारणीसोबतच ज्येष्ठ नागरिकांनाही (Senior Citizen) सूट मिळण्याची अपेक्षा आहे.
आगामी अर्थसंकल्पात ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे भाड्यात सवलत दिली जाऊ शकते. कोरोना महामारीच्या काळात या लोकांना करात कोणतीही सूट देण्यात आलेली नव्हती. आतापर्यंत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे भाड्यात सूट देण्याचं कोणतंही आश्वासन दिलेलं नाही. अशा परिस्थितीत अर्थमंत्री निर्मला सीतारामन आपल्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटच्या सत्रात रेल्वे भाड्यात सवलत जाहीर करू शकतात, अशी आशा सर्वसामान्यांना आहे.
यंदाच्या वर्षात रेल्वेला प्रचंड नफा
गेल्या काही महिन्यांत रेल्वेनं प्रचंड कमाई केली आहे. रेल्वेनं सादर केलेल्या आकडेवारीनुसार, एप्रिल 2022 ते डिसेंबर 2022 दरम्यान, म्हणजेच 9 महिन्यांच्या कालावधीत रेल्वेनं केवळ रेल्वे भाड्यातून 48,913 कोटी कमावले आहेत. गेल्या वर्षी याच काळातील कमाईपेक्षा यंदा 71 टक्के कमाई वाढली आहे. गेल्या वर्षातील वाढलेल्या कमाईमुळे ज्येष्ठ नागरिकांना यंदा प्रवास भाड्यात सवलत मिळणं अपेक्षित आहे.
ज्येष्ठ नागरिकांना किती सवलत?
कोरोना कालावधीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांना भाड्यात सूट दिली जात होती. परंतु, कोरोनामुळे 2019 पासून रेल्वे कर्मचाऱ्यांना मिळणारी ही सूट रद्द करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे प्रवास भाड्यात मिळणारी सूटही रद्द करण्यात आलेली आहे. यापूर्वी 60 वर्षांवरील व्यक्तींना भाड्यात 40 टक्के सवलत दिली जात होती. तर 58 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांना 50 टक्के सवलत दिली जात होती.
रेल्वे प्रवासी भाड्यात 53 टक्क्यांची सूट
संसदेत एका प्रश्नाचं उत्तर देताना रेल्वे मंत्रालयानं सांगितलं होतं की, रेल्वेनं प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांना सरासरी 53 टक्के सवलत दिली जाते. याशिवाय दिव्यांग, विद्यार्थी आणि रुग्णांनाही रेल्वे सवलत देते. रेल्वेमंत्र्यांनी संसदेत सांगितलं होतं की, 2019-20 मध्ये रेल्वेनं प्रवाशांच्या तिकिटांवर 59,837 कोटी रुपयांची सबसिडी दिली आहे. याचा अर्थ सरासरी 53 टक्के सवलत देण्यात आली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :