Union Budget 2023 India : भारताकडे तळपता तारा म्हणून जग पाहत आहे, कोरोना महामारी आणि युद्ध यामुळे जागतिक अर्थव्यस्था मोठ्या प्रमाणात मंदावली होती. जगातील अर्थचक्र मंदावले असतानाही चालू वर्षी आपला विकास दर सात टक्के राहील असा अंदाज आहे. जगातील सर्व महत्वाच्या अर्थव्यवस्थामध्ये हा दर सर्वोच्च आहे. भारत जगातील सर्वात मोठी पाचवी अर्थव्यवस्था आहे, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण (Nirmala Sitharaman) म्हणाल्या.  आज मोदी सरकारचा नववा अर्थसंकल्प झाला. केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामण  (Nirmala Sitharaman) यांनी अर्थसंकल्प सादर केला. टॅक्समध्ये मोठी सूट देत मोदी सरकारनं मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा दिल्याचा दावा केला आहे. 


अर्थसंकल्पीय भाषणाच्या सुरुवातील अर्थमंत्री निर्मला सीतारामण (Nirmala Sitharaman)  म्हणाल्या की, अमृत काळामधील हा पहिला अर्थसंकल्प आहे. हा अर्थसंकल्प मागील अर्थसंकल्पात रचलेल्या पायावर आणि भारत@ 100 साठी रचलेल्या ब्ल्यू प्रिंटवर आधारीत आहे.  समृद्ध आणि सर्वसमावेशक भारताचा संकल्प याद्वारे करत आहोत, यामुळे विकासाची फळं सर्वांपर्यंत पोहोचावीत, असं त्या म्हणाल्या. 


त्यांनी पुढं म्हटलं की,  नागरिकांसाठी संधीची उपलब्धता, विकासाला मोठी चालना आणि रोजगार निर्मिती, मॅक्रोइकॉनमिक स्थैर्य अधिक बळकट करणे या तीन आर्थिक अजेंड्यावर आम्ही लक्ष केंद्रित केले आहे. पंतप्रधानांनी पर्यावरणसंवर्धनासाठी एक जीवनशैली सुचवली आहे. पंचामृत- 2070 पर्यंत निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जन साध्य करण्याच्या दिशेनं भारताची खंबीर वाटचाल सुरु आहे. हरित (पर्यावरण आणि पर्यावरणपूरक,) वाढीवर लक्ष केंद्रीत करण्याचा आमचा भर, हा अर्थसंकल्प स्पष्ट करतो, असे निर्मला सीतारामण म्हणाल्या.  






"योजनेत आर्थिक सहाय्य, कार्यक्षम हरीत तंत्रज्ञानाची उपलब्धता, प्रगत कौशल्य प्रशिक्षण, सामाजिक सुरक्षितता, आधुनिक डिजिटल तंत्र, उत्पादनाची जाहिरात, बाजारपेठेची उपलब्धता या घटकांचा समावेश असेल; दुर्बल घटकातील लोकांना त्याचा खूप फायदा होईल."  राज्यांचा सक्रिय सहभाग आणि सार्वजनिक - खाजगी भागीदारीने पर्यटन क्षेत्राला मिशन मोड वर प्रोत्साहन देणार, असेही अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान अर्थमंत्री म्हणाल्या.  अर्थसंकल्पात सात प्रमुख गोष्टींना प्राधान्य दिलं असल्याचं अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केलेय. ते 7 प्राधान्यक्रम खालील प्रमाणे आहेत.





 1. सर्वसमावेशक विकास
 2. शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणे
 3. पायाभूत सुविधा आणि गुंतवणूक
 4. क्षमतेला वाव
 5. हरीत (पर्यावरण आणि पर्यावरणपूरक) विकास
 6. युवा शक्ती
 7. आर्थिक क्षेत्र