मुंबई : केंद्रीय निर्मला सीतारामन यांनी 2025-26 या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पाचा केंद्रबिंदू मध्यमवर्ग राहिला आहे. अर्थसंकल्पाचा दिवस शनिवार असल्यानं त्या दिवशी शेअर बाजाराचं विशेष सत्र आयोजित करण्यात आलं होतं. बजेट सादर होताच शेअर बाजारात त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येईल, अशी अनेकांना अपेक्षा होती. मात्र, निफ्टी 50 घसरणीसह बंद झाला. तर, सेन्सेक्समध्ये देखील फारशी तेजी दिसून आली नाही. आता आजपासून सुरु होत असलेल्या आठवड्यात भारतीय शेअर बाजारात तेजी की मंदी राहणार हे काही घटक निश्चित करणार आहेत. ते घटक कोणते ते जाणून घेऊयात.
शेअर बाजारावर कोणते घटक प्रभावी ठरणार?
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समितीची बैठक 5 फेब्रुवारी ते 7 फेब्रुवारी ला होणार आहे. या बैठकीत आरबीआयकडून रेपो रेटमध्ये कपात केली जाणार का हे पाहावं लागेल. आरबीआयनं व्याज दरात कपात केल्यास त्याचा शेअर बाजारावर सकारात्मक परिणाम दिसेल. मात्र, आरबीआयनं जर व्याज दरात कपात केली नाही तर शेअर बाजारावर त्याचा नकारात्मक परिणाम जाणवू शकतो, असा अंदाज आर्थिक क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केला आहे.
विदेशी गुंतवणूकदारांच्या भूमिकेवर देखील बाजारातील तेजी आणि घसरण अवलंबून आहे. जानेवारी महिन्यात विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून काढता पाय घेतला होता. त्यामुळं जानेवारीत शेअर बाजारात घसरणीचं चित्र होतं. यासह भारतातील कंपन्यांच्या तिसऱ्या तिमाहीतील कामगिरीचे अहवाल, जागतिक आर्थिक राजकीय स्थिती देखील शेअर बाजाराच्या कामगिरीवर प्रभावी ठरेल. मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्विसेस लिमिटेडचे रिसर्च हेड सिद्धार्थ खेमका यांनी येत्या आठवड्यात जानेवारी महिन्याचा अमेरिका आणि भारताचा परचेसिंग मॅनेजर्स इंडेक्स जाहीर होईल, तो आकडा देखील महत्त्वाचा ठरेल, असं म्हटलं.
येत्या शुक्रवारी म्हणजेत 7 फेब्रुवारी रोजी आरबीआयकडून चलनविषयक धोरण जारी केलं जाईल. त्याचा परिणाम शेअर बाजारात जाणवू शकतो.
विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार आणि देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदार देखील मार्केटचा ट्रेंड सेट करु शकतात. जानेवारी महिन्यात विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून 70 हजार कोटी रुपये काढून गेतले होते. भारतीय संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या कामगिरीमुळं मार्केटला आधार मिळू शकतो.
एशियन पेंट्स, टाटा पॉवर, पीसी ज्वेलर्स, टायटन, अपोलो टायर्स, भारती एअरटेल, आयटीसी, एसबीआय, एनएचपीसी या कंपन्यांचे तिसऱ्या तिमाहीचे आकडे या आठवड्यात येतील. त्याचा देखील परिणाम बाजारावर होईल. काही तज्ज्ञांच्या मते मार्केटचा ट्रेंड सकारात्मक आहे. निफ्टी 50 चा निर्देशांक 24 हजारांचा टप्पा पार करेल, असा अंदाज तज्ज्ञांना आहे. विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची बजेटवरील प्रतिक्रिया आज येईल,अशी शक्यता काही तज्ज्ञांनी व्यक्त केली.
इतर बातम्या :