PM Narendra Modi : गुरुवारी अर्थमंत्री निर्मला सितारामण (Nirmala Sitharaman) अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्याआधी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी (Union Budget 2024) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी संबोधित केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधाकांना टोला लगावला. त्याशिवाय अंतरिम अर्थसंकल्पाविषयी त्यांनी मत व्यक्त केले. नारीशक्तीच्या नव्या पर्वाची सुरुवात झाल्याचेही ते म्हणाले.
या नवीन संसद भवनात झालेल्या पहिल्या अधिवेशनाच्या शेवटी, या संसदेने एक अतिशय सन्मानजनक निर्णय घेतला होता. जो नारीशक्तीला सक्षम करणारा होता. 26 जानेवारी रोजी कर्तव्यपथावर नारी शक्तीचं सामार्थ स्थैर्य, संकल्पशक्ती देशाने पाहिली. आज अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे, तेव्हा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे मार्गदर्शन आणि उद्या निर्मला सीतारामण यांचे अंतरिम अर्थसंकल्प हे एक प्रकारे, स्त्री शक्तीच्या साक्षात्काराचं पर्व होय.
मागील 10 वर्षात संसदेत प्रत्येकाने आपल्याला मार्गाने आपले काम केले. ज्यांना गोंधळ घालण्याची सवय झाली आहे. लोकशाही मूल्यांना फाटा देत अशा सर्व खासदारांनी आत्मपरीक्षण करायला हवे. मागील 10 वर्षात त्यांनी काय केले, हे त्यांनी त्यांच्या लोकसभा मतदारसंघातील 100 लोकांना विचारावं, कोणालाच आठवणार नाही. कुणाला नावही माहीत नसेल. पण ज्यांनी सभागृहात चांगल्या विचारांनी संसदेचा फायदा करून दिला, अशा लोकांचा एक मोठा वर्ग आजही त्यांना स्मरणात ठेवेल आणि त्यांचे कौतुक करेल. आतापर्यंत संसदेत घातलेल्या गोंधळावर पश्चातापाची विरोधकांना संधी आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
सार्वत्रिक निवडणुका जवळ आल्या असताना पूर्ण अर्थसंकल्प ठेवला जात नाही, आम्हीही तीच परंपरा पाळू आणि नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर पूर्ण अर्थसंकल्प घेऊन येऊ. यावेळी देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन उद्या आपल्या सर्वांसमोर मार्गदर्शक तत्त्वांसह अर्थसंकल्प सादर करतील. देश प्रगतीची नवीन शिखरे पार करत सतत पुढे जात असल्याचा मला विश्वास आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.