मुंबई: यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन कोणत्या महत्त्वाच्या घोषणा करणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) या आठव्यांदा संसदेत अर्थसंकल्प (Budget 2025) मांडणार आहेत. या अर्थसंकल्पात गृह कर्जधारकांसाठी (Home Loan) काही महत्त्वाच्या घोषणा होऊ शकतात, असा अंदाज आहे. जाणकारांच्या अंदाजानुसार, केंद्र सरकारकडून गृह कर्जावरील व्याजाच्या आधारे प्राप्तीकरात देण्यात येणारी सूट आणखी वाढवली जाऊ शकते. सध्या होम लोनच्या व्याजावर आयकरात 2 लाखांपर्यंतची सूट मिळते. मात्र, मध्यमवर्गीयांना घर घेणे सोपे व्हावे, यासाठी केंद्र सरकार होम लोनवरील Tax Deduction च्या मर्यादेत वाढ केली जाऊ शकते.
याशिवाय, केंद्र सरकारकडून परवडणाऱ्या घरांसाठीची (Affordable homes) किंमतीची मर्यादा वाढवली जाऊ शकते. सध्या परवडणाऱ्या घरांसाठी 45 लाख रुपयांची मर्यादा निश्चित करुन देण्यात आली आहे. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये मेट्रो शहरांमध्ये बांधकामाचा वाढलेला खर्च आणि इतर घटक लक्षात घेता केंद्र सरकारने ही मर्यादा 75 ते 80 लाखांपर्यंत वाढवावी, अशी मागणी सातत्याने केली जात आहे. त्यादृष्टीने केंद्रीय अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा होऊ शकते. केंद्र सरकारकडून बांधकाम व्यावसायिकांसाठी त्यादृष्टीने कर सवलती जाहीर केल्या जाऊ शकतात, असा अंदाज आहे.
'रेलिगेअर ब्रोकिंग' कंपनीच्या रवी सिंग यांच्या अंदाजानुसार, यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात बांधकाम क्षेत्र आणि घरबांधणी क्षेत्राच्यादृष्टीने महत्त्वाचे निर्णय जाहीर होऊ शकतात. नव्या घरांसाठी आकारण्यात येणारे मुद्रांक शुल्क (Stamp Duty), सवलती याबाबत महत्त्वाच्या घोषणा होऊ शकतात. तसेच पंतप्रधान आवास योजनेच्या निकषांची पुर्नरचना करण्यासंदर्भात सातत्याने होणारी मागणी यंदा पूर्ण होऊ शकते, अशी अपेक्षा व्यक्त केली जात असल्याचे रवी सिंग यांनी सांगितले.
पंतप्रधान मोदी यांचे महत्त्वाचे संकेत
दिल्लीत शुक्रवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली. त्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी म्हटले की, गरीब, मध्यमवर्गीयांना आशीर्वाद मिळावा यासाठी मी देवी लक्ष्मीला प्रार्थना करतो. 'विकसित भारताचे' उद्दिष्ट साध्य करण्यासाठी या अधिवेशनात नवा आत्मविश्वास निर्माण होईल, असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला होता.
आणखी वाचा
आयकरपासून, पेन्शन, वंदे भारत, शेतकऱ्यांपर्यंत; आज केंद्रीय अर्थसंकल्पात होणार मोठ्या घोषणा
नव्या टॅक्स रिजीममध्ये 10 ते 50 लाखांदरम्यान उत्पन्न, 2025-26 मध्ये किती प्राप्तिकर भरावा लागेल?