Budget 2022 Tax structure :  केंद्र सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात कर रचनेत कोणताही बदल करण्यात आला नाही. मध्यमवर्गीयांना या अर्थसंकल्पात कर कपात होईल अशी अपेक्षा होती. मात्र, त्यांचा अपेक्षाभंग झाला. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी पत्रकार परिषदेत  कररचनेबाबत भाष्य करताना आम्ही करदेखील वाढवले नाहीत असे म्हटले. 


मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना मध्यमवर्गीयांना आयकरात दिलासा मिळाला नसल्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी उत्तर देताना त्यांनी म्हटले की, कोरोना महासाथीच्या काळात सरकारने मोठ्या प्रमाणावर वाढलेला खर्च  भागवण्यासाठी इतर ठिकाणांहून निधी जमवला. या खर्चासाठी कोणताही कर लावला नसल्याचे त्यांनी सांगितले. 


लोकांवर ओझं नको


अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी म्हटले की, मागील वर्षीदेखील कर वाढवण्यात आले नव्हते. कराच्या माध्यमातून एक रुपयादेखील अतिरिक्त घेतला नसल्याचे त्यांनी सांगितले. मागील वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना काळाच्या दरम्यान वित्तीय तूटीचा चिंता न करता कामा नये. मात्र, नागरिकांवर करांचे अतिरिक्त ओझे असता कामा नये असे निर्देश दिले होते. 


मध्यमवर्गाचा लाभ


सीतारमण यांनी सांगितले की, एमएसएमई (लघु, सुक्ष्म आणि मध्यम उद्योग) , स्वस्त घरं, पासपोर्टबाबत केलेल्या घोषणांचा फायदा मध्यमवर्गालाच होणार असल्याचे सीतारमण यांनी म्हटले. 


कर रचनेत बदल नाही 


टॅक्स स्लॅब         उत्पन्न  कर


2.5 लाख -          कोणताही कर नाही


2.5 लाख ते 5 लाख -  5 टक्के कर


5 लाख ते 7.5 लाख -  10 टक्के 


7.5 लाख ते 10 लाख - 15 टक्के 


10 लाख ते 12.5 लाख -   20 टक्के कर 


12.5 लाख ते 15 लाख -   25 टक्के 


15 लाखांपेक्षा जास्त -  30 टक्के कर