Railway Budget 2022 :  केंद्रीय अर्थसंकल्प सादर होत असताना रेल्वेसाठीच्या तरतुदींकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या पोतडीतून रेल्वेसाठी मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे. मुंबईकर आणि महाराष्ट्राला रेल्वेच्या अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. वर्ष 2017 पर्यंत रेल्वे अर्थसंकल्प स्वतंत्रपणे सादर केला जात होता. त्यानंतर रेल्वे अर्थसंकल्प केंद्रीय अर्थसंकल्पात विलीन करण्यात आला. यंदाच्या अर्थसंकल्पात रेल्वेच्या अर्थसंकल्पात 20 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. 


नवीन ट्रेनची घोषणा 


पाच राज्यांमध्ये असलेल्या निवडणुका लक्षात घेता नवीन  रेल्वे मार्गांची आणि ट्रेनची घोषणा होण्याची दाट शक्यता आहे. रेल्वे बजेटमध्ये हायस्पीड ट्रेनची घोषणा होण्याचीही शक्यता आहे. निवडणूक असलेली राज्ये आणि मोठ्या शहरांमध्ये रेल्वे वाहतूक मजबूत करण्यासाठी योजना आखल्या जात आहेत. यासाठी सरकार काही खासगी कंपन्यांना सहभागी करून घेऊ शकते. नवी दिल्ली ते वाराणसी दरम्यान बुलेट ट्रेनचीही घोषणा होऊ शकते. नव्या मार्गांवर 'वंदे भारत'सारख्या सेमी हायस्पीड ट्रेनची घोषणा होऊ शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याआधीच 75 शहरांना 'वंदे भारत'ने जोडणार असल्याची घोषणा केली होती. आणखी नव्या बुलेट ट्रेनची घोषणा होऊ शकते


पायाभूत सुविधा


वजनाने हलक्या असणाऱ्या रेल्वे कोचची निर्मिती करण्यावर भर दिला जात आहे. ट्रेनची संख्या वाढवण्यासाठी अॅल्यूमिनियम ट्रेनची निर्मिती करण्याची घोषणा करण्यात येऊ शकते. त्याशिवाय रेल्वेच्या पायाभूत सुविधांवरही भर देण्याच्या अनुषंगाने मोठी घोषणा होऊ शकते. 


रेल्वेच्या जमिनीतून निधी उभारणार?


भारतीय रेल्वेला मोठ्या प्रमाणावर निधीची आवश्यकता आहे. रेल्वेकडे मोठ्या प्रमाणावर जमिनी आहेत. या जमिनींचा विकास करण्याबाबत चर्चा सुरू आहेत. रेल्वेच्या ताब्यात असणाऱ्या जमिनीतून निधी उभारण्याबाबतही अर्थसंकल्पात घोषणा होऊ शकते. 


मुंबईकरांना काय मिळणार?


अर्थमंत्री निर्मला सीतारमण अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी रेल्वेचे कोणते नवे प्रकल्प जाहीर करणार याकडे राज्यातील जनतेचे डोळे लागले आहेत. विशेषतः मुंबईकरांना लोकल प्रवासात दिलासा देण्यासाठी केंद्र सरकार कोणत्या नव्या घोषणा करणार याची उत्सुकता आहे. मुंबईत रेल्वेच्या पायाभूत सुविधांसाठी केंद्राकडे १ हजार कोटी रुपयांची मागणी करण्यात आलीय. मुंबई रेल्वे विकास महामंडळाची ही मागणी पूर्ण झाल्यास राज्य सरकारचा १ हजार कोटी रुपयांचा वाटा मिळेल आणि दोन हजार कोटी रुपयांची तरतूद होऊ शकेल. मुंबईत एसी लोकलच्या एकेरी प्रवासाचं तिकीट स्वस्त होण्याची शक्यता आहे.


वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत लोकलची संख्या वाढवण्यात यावी अशी प्रवाशांची मागणी आहे. मुंबई उपनगरीय रेल्वेचा विस्तार करण्याच्या अनुषंगाने घोषणा होण्याची शक्यता आहे. कल्याण-बदलापूर दरम्यान तिसरी आणि चौथी मार्गिका, कल्याण आणि आसनगाव दरम्यान चौथी मार्गिका, बोरिवली ते विरार दरम्यान पाचवी आणि सहावी मार्गिका, बोरिवलीपर्यंत हार्बर लोकलचा विस्तार करणे, पनवेल-कर्जत दरम्यान नवीन कॉरिडोर आदी सारख्या योजना मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या क्षेत्रातील जिल्ह्यांच्या विकासासाठी महत्त्वाच्या आहेत.  


इतर महत्त्वाच्या बातम्या: