Rakesh Tikait on Union Budget 2022: आज सादर केलेल्या अर्थसंकल्पावर अनेक शेतकरी नेत्यांनी टीका केली आहे. भारतीय किसान युनियने नेते (BKU) राकेश टिकैत यांनीही टीका केली आहे. अर्थसंकल्पात सरकारने हमीभावाने किती शेतमाल खरेदी करणार ते सांगितले, मात्र मागील वर्षी किती खरेदी झाली हे सरकारने सांगितले नाही. तेदेखील सरकारने सांगावे असे टिकैत म्हणाले. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला संबोधीत केले होते. यामध्ये त्यांनी हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांसाठी आणि गरिबांसाठी खास असल्याचे म्हटले होते. त्यानंतर राकेश टिकैत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
 
हमीभावच्या कायद्यानंतरच शेतकऱ्यांचा फायदा होणार


आजच्या अर्थसंकल्पात सरकारने मोठ्या प्रमाणावर शेतमालाची खरेदी करणार असल्याची घोषणा केली आहे. यावर राकेश टिकैत यांनी निशाणा साधला आहे. सरकारने मागच्या वर्षी किती खरेदी केली आहे ते सांगितले नाही. त्यामुळे जोपर्यंत हमीभावाचा कायदा होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांचा फायदा होणार नसल्याचे टिकैत म्हणाले. कमी दरामध्ये शेतकऱ्यांच्या शेतमालाची व्यापाऱ्यांकडून खरेदी केली जाते. त्यानंतर व्यापारी शेतमालाला हमीभावाने सरकारला विकत असल्याचे टिकैत म्हणाले.


सरकार सतत डिजिटल इंडियाबद्दल बोलत असते. पण त्यातून आमचे पैसे का येत नाहीत? शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी केल्यानंतर त्याचे पैसे थेट शेतकऱ्याच्या खात्यात जमा केले जावेत. तसेतच शेतकऱ्यांना उसाचे पेमेंट वेळेवर मिळत नाही, ते आधी करा. सरकारने जर हे केले तर आम्हीही सरकारचे आभार मानू, असेही टिकैत यावेळी म्हणाले. सरकारने हे वर्ष भरड धान्याचे वर्ष म्हणून जाहीर करण्याची घोषणा केली आहे. यावर राकेश टिकैत म्हणाले की, भरड धान्य विकत घेतले तर आजार कमी होतात ही चांगली गोष्ट आहे. पण त्याच्या खरेदीची हमी द्यावी लागेल. 23 पिकांच्या खरेदीची हमी द्या. मध्य प्रदेशात शेतकरी ज्वारी घेऊन रस्त्यावर उतरले होते. महिनाभरापासून खरेदी केली नाही असे टिकैत म्हणाले.


दरम्यान, अर्थसंकल्प सादर करताना सीतारमण यांनी शेतकर्‍यांना त्यांची MSP थेट खात्यात हस्तांतरित केली जाईल असे सांगितले. MSP वर 2.37 लाख कोटी खर्च केले जातील असेही सांगण्यात आले आहे. पिकांची काळजी घेण्यासाठी किसान ड्रोनचा वापर केला जाईल. तसेच कीटकनाशकांच्या फवारणीसाठीही ड्रोनचा वापर केला जाणार असल्याचेही अर्थसंकल्पात सांगण्यात आले आहे. 


महत्त्वाच्या बातम्या: